वाघनखं योग्यवेळी आली, वेळेवर उपयोग करु; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

By नितीन काळेल | Published: July 19, 2024 07:22 PM2024-07-19T19:22:03+5:302024-07-19T19:24:18+5:30

माझे ओरखडे बसले तर सांगताही येत नसल्याचा ठाकरेंना टोला, फडणवीस म्हणाले..

The Waghnakh came at the right time. Use it at the right time, Chief Minister Eknath Shinde warning | वाघनखं योग्यवेळी आली, वेळेवर उपयोग करु; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

वाघनखं योग्यवेळी आली, वेळेवर उपयोग करु; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

सातारा : वाघनखं आली हा अभिमानाचा दिवस आहे. पण, वाघनखांबद्दल काही लोक शंका उपस्थित करतात हे दुर्दैव आहे. चांगल्या कामाला गालबोट लावण्याचं हे काम आहे. तरीही ही वाघनखं योग्यवेळी आलीत. त्याचा योग्यवेळी वापर करु, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. बसले तर तोंड उघडूनही सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांना लगावला. दरम्यान, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही काहींच्या बुध्दीवर बुरशी चढल्याची टीका करत विरोधकांवर घणाघात केला.

सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात शिवशस्त्रशौर्यगाथा- शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लंडनमधून वाघनखं आणून सरकारनं आपला शब्द पाळला. कारण, ही वाघनखं महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दगाबाज अफजलखानाचा कोथळा याच वाघनखानं काढला होता. वाघनखांमुळे सर्वांत आनंद दिसत आहे. पण, यावर शंका घेतली जात आहे. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शाैर्य आणि वीरतेचा अपमान केला जातोय. राज्यातील शिवभक्त हे कदापाही सहन करणार नाहीत.

राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम सरकार करत आहे. महिला, शेतकरी, तरुण, विद्याऱ्थी यांच्यासाठी योजना आणल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विरोधक पैसे कोठून आणणार म्हणून योजनांवर आक्षेप घेतात. तरीही आम्ही तिघांनी ठरवलं तर काहीही होतं. कारण योजनांचे पैसे वेळच्यावेळी लाभाऱ्श्यांच्या खात्यावर पोहोचतील. कारण आम्हाला वैयक्तीक स्वाऱ्थ नाही. आम्ही देणारे आहोत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरूवात आक्रमकपणे केली. ते म्हणाले, वाघनखं आणून दर्शनासाठी खुली केली. यापेक्षा मोठे भाग्य नाही. पण, काहींचा वादविवाद करण्याचा धंदा आहे. हा काय आजचा रोग नाही. याचा छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्रास झाला. तरीही त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. येथील काहींच्या बुध्दीवर बुरशी आणि गंज चढला आहे. ते काढण्याचे काम मुख्यमंत्री नक्की करतील असा विश्वास वाटतो.

प्रतापगड विकास प्राधीकरण; १५० कोटींची तरतूद..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान राज्यातील गडकोट, किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचे काम सरकारचे असल्याचे सांगितले. तसेच प्रतापगड विकास प्राधिकारणची खासदार उदयनराजेंच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली असल्याचे सांगत त्याचा अध्यादेश दाखवला. नंतर अध्यादेश खासदार उदयनराजेंकडे देण्यात आला. तसेच यासाठी शासनाने १५० कोटींची तरतूद केल्याचेही जाहीर केले. तर संगम माहुली येथील महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णाेध्दारही करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

अजित पवारांचा हल्लाबोल अन् कायद्यामुळे जीव असेपर्यंत दारु उतरणार..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकावर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच वाघनखांवरुनही जोरदार फैरी झाडल्या. चांगले घडत असेल तर खोडा घालण्याचे काम करण्यात येते. त्यांना यातून काय समाधान मिळते हे माहीत नाही. अऱ्थसंकल्पातही सरकारने नवीन योजना जाहीर केल्या. चांगल्या योजना असूनही विराेधक टिका करतात. चुनावी जुमला बंद करा म्हणतात. पण, जनतेलाही खोटं कोण बोलतंय हे कळतंय, असा टोला लगावला. तसेच लोकसभेला दुर्लक्ष झालं. विधानसभेला जरा लक्ष द्या, असेही त्यांनी उपस्थितांना हसत-हसत आवाहन केले. किल्ल्यावरील मद्यप्राशनाबद्दल कडक कायदा करणार आहे. कारवाई झाली की जीव असेपर्यंत त्याची उतरलेली असेल. परत कधीच चढणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

Web Title: The Waghnakh came at the right time. Use it at the right time, Chief Minister Eknath Shinde warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.