रस्ता भरकटलेल्या तरसाचा साताऱ्यातील माची पेठेतील वस्तीत वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:25 PM2024-12-03T15:25:52+5:302024-12-03T15:32:55+5:30

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुसऱ्यांदा दर्शन

The wanderlust of Tarsha in Satara's Machi Pethe area | रस्ता भरकटलेल्या तरसाचा साताऱ्यातील माची पेठेतील वस्तीत वावर

रस्ता भरकटलेल्या तरसाचा साताऱ्यातील माची पेठेतील वस्तीत वावर

सातारा : साताऱ्यातील माची पेठ परिसरात तरसाचा वावर वाढला असून, रविवारी मध्यरात्री पुन्हा एकदा हे तरस रस्त्यावर फिरताना आढळून आले. देवेज्ञ मंगल कार्यालय ते फुटका तलाव या मार्गावर असलेल्या एका बेकरीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले आहे.

किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला असलेल्या माची पेठ परिसरात आजवर अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. मात्र, तरस नजरेस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. माची पेठेतील एका घराच्या छतावर हे तरस आढळून आले होते. वाट चुकल्याने ते बिथरले होते. त्यामुळे रस्ता दिसेल तिथे ते पळत होते. भटक्या कुत्र्यांनीदेखील या तरसाचा पाठलाग केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले होते. या घटनेनंतर वनविभागाने तरस पकडण्यासाठी पथकाची नेमणूक केली. दोन दिवसांपासून हे पथक माची पेठ परिसरात गस्त घालत आहे. मात्र, तरस कोठेही आढळून आले नाही.

दरम्यान, सोमवारी मध्यरात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास हे तरस देवेज्ञ मंगल कार्यालय ते फुटका तलाव या मार्गावर फिरताना आढळून आले. एका बेकरीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले आहे. या तरसाने कोणावरही हल्ला केला नसला तरी नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, रात्री उशिरा घराबाहेर पडू नये, तरस आढळून आल्यास तातडीने सूचित करावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

त्यामुळे भरकटले असावे..

किल्ले अजिंक्यताऱ्यावर पालिकेकडून संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे एखादा वन्यप्राणी मानवी वस्तीत आलाच तर तो आपली वाट चुकू शकतो. किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य रस्ता वगळता पायरी मार्ग व खालची मंगळाई या ठिकाणाहून जाण्याचा मार्ग मोकळा आहे. शहरात मानवी वस्तीत आलेले तरस यामुळे रस्ता चुकले असावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Web Title: The wanderlust of Tarsha in Satara's Machi Pethe area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.