सातारा: पायावरून गेले उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक, बारा वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:01 PM2022-11-07T19:01:37+5:302022-11-07T19:02:11+5:30
दोन्ही मांडीवरून चाक गेल्याने गंभीर दुखापत
आदर्की : हिंगणगाव-कापशी रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीने मुलाला धडक दिल्याने तो पाठीमागील चाकाखाली आला. त्यात गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रेयस महेंद्र खताळ (वय १२, रा. कापशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध विकास खताळ यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
लोणंद-आळजापूर रस्त्यावर-कापशी-हिंगणगावदरम्यान हिंगणगाव बाजूने रविवार, दि. ६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच ११ यु ३१०७) ट्रॉली चालक संदीप कचरू पायघन (रा. सुप्पा, ता. पाटोदा, जि. बीड) हा झोलामारत भरधाव वेगाने निघाला होता. कापशी गावाजवळील खताळ वस्तीजवळ विकास खताळ यांचे घरातून बाहेर पडताना श्रेयस महेंद्र खताळ याला पाठीमागील जुगाडाचा धक्का लागला. यात तो पाठीमागील चाकाखाली गेला.
त्याच्या दोन्ही मांडीवरून चाक गेल्याने गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला उपचारासाठी फलटण येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले.