पत्नी घटस्फोट देईना, सासऱ्याचा फोटो स्टुडिओ पेटवला!
By दत्ता यादव | Published: March 14, 2024 10:20 PM2024-03-14T22:20:32+5:302024-03-14T22:20:55+5:30
डिस्कळ येथील घटना; जावयासह तीन मित्रांना अटक.
सातारा : पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावयाने तीन मित्रांना सोबत घेऊन सासऱ्याचा फोटो स्टुडीओ पेटवल्याचे पुसेगाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी जावयासह त्याच्या तीन मित्रांनाही अटक केली.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डिस्कळ, ता. खटाव येथील पंचरत्न कॉम्प्लेक्समधील फोटो स्टुडीओला शुक्रवार, दि. ८ रोजी रात्री अज्ञाताने आग लावून पळ काढला होता. या आगीत फोटो स्टुडीओचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणाचा पुसेगाव पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर एका पुलावर चारचाकी गाडीचा अपघात होऊन ती भरधाव वेगाने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गाडीच्या नंबरवरून आरोपी निष्पन्न केले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून चाैकशी केली असता हा प्रकार अशोक विठ्ठल यादव (वय ५१, रा. मोळ, ता. खटाव) यांचे जावई पृथ्वीराज प्रदीप गायकवाड (२४, रा. कार्वे, ता. कऱ्हाड) याने त्याचे मित्र योगेश संजय भोसले (२४, रा. उरण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), आकाश प्रभाकर शेळके (२४, रा. कार्वे, ता. कऱ्हाड), गौरव दिलीप थोरात (२३, रा. कार्वे) यांना सोबत घेऊन केल्याची कबुली दिली. फोटो स्टुडीओचे मालक यांची मुलगी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावई पृथ्वीराज गायकवाड याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले. संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे, पोलिस हवालदार योगेश बागल, पोलिस नाईक सुनील अबदागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी ही कारवाई केली.