Satara: 'लेकच हवी' सांगून ते गेले, अन् ती आली; पुसेसावळी हल्ल्यातील मृताच्या पत्नीने दिला मुलीला जन्म
By प्रगती पाटील | Published: January 17, 2024 04:14 PM2024-01-17T16:14:18+5:302024-01-17T16:14:31+5:30
जन्म झाल्यानंतर बाळाचं रडणे स्वाभाविक असते. सिझेरियन पद्धतीने रविवारी जन्मलेली अशनूर अन्य बाळांसारखी रडली नाही
प्रगती जाधव-पाटील
सातारा : ‘...त्यांची फार इच्छा होती मुलगीच व्हावी. रंगाने, नाकाने ती माझ्यासारखी असली, तरी गालावरची खळी आणि डोळे तुझे असावेत, असं ते सारखं बोलायचे. झालेही तसेच. रविवारी ‘तिचा’ जन्म झाला. पती आमच्यातून निघून गेले; मात्र ‘तिच्या’ रूपाने ते माझ्या आयुष्यात पुन्हा आले..’ आयेशा सांगत होती आपल्या एक दिवसाच्या लेकीची कहाणी..
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री झालेल्या हल्ल्यात नुरुलहसन लियाकत शिकलगार (वय ३०) या अभियंता युवकाचा नाहक बळी गेला. ही दंगल उसळली तेव्हा नुरुलहसनची पत्नी आयेशा पाच महिन्यांची गर्भवती होती. दंगलीच्या आदल्या दिवशीच पती-पत्नी सोनोग्राफी करून आले होते. परतीच्या प्रवासात दोघांनीही बाळाविषयी एकमेकांची मते जाणून घेतली होती.
मुलगा व्हावा, असं आयेशाला वाटत होते, तर नुरुलहसनला मुलीच्या प्रेमाची आस होती. दंगलीच्या आदल्या दिवशीच त्यांनी आपल्या बाळाविषयीची स्वप्ने रंगविली होती; मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. बाळाचा जन्म होण्यापूर्वीच नियतीने बाळाच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हिरावून घेतले. दंगलीत नुरुलहसनचा नाहक जीव गेला. त्यानंतर चार महिन्यांनी आयेशाची कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. तिने गोंड्स मुलीला जन्म दिला. आता लेकीच्या रूपाने पती नुरुलहसन पुन्हा आमच्या कुटुंबात आलेत, अशी आयेशाची भावना आहे. म्हणूनच तिने आयेशा आणि नुरुलहसन या दोन्ही नावांतून लेकीचं नाव ‘अशनूर’ ठेवलंय.
ती रडलीच नाही..!
जन्म झाल्यानंतर बाळाचं रडणे स्वाभाविक असते. सिझेरियन पद्धतीने रविवारी जन्मलेली अशनूर अन्य बाळांसारखी रडली नाही. जन्म झाल्यापासून तिने तिच्या चैतन्यमयी हालचालींनी अवघ्या घराला नवी ऊर्जा प्रदान केली आहे. नुरुलहसनच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी या चिमुकलीने अवघ्या दोन दिवसांत भरून काढली आहे.
‘अशनूर’ देणार जगण्याचं बळ
दंगलीने एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकलं. २० नोव्हेंबर २०२२ ला नुरुलहसन आणि आयेशा यांचे लग्न झाले. ही दोघेही त्यांच्या पालकांची एकुलती एक अपत्य असल्याने दोन कुटुंबे एकत्रच नांदत होती. आयुष्याच्या माहेरची शेती करणे असो किंवा अन्य काही जबाबदाऱ्या असो त्या पार पाडण्यात नुरुलहसन कुठेही कमी पडत नव्हते. हसतं-खेळतं कुटुंब अवघ्या काही क्षणात विस्कटून गेले.