सत्ता गेल्याच्या नैराश्येतून आघाडीचे राज्यात अशांतता निर्माणचे काम, केशव उपाध्ये यांचा आरोप
By नितीन काळेल | Published: September 2, 2024 07:22 PM2024-09-02T19:22:09+5:302024-09-02T19:24:41+5:30
विधानसभा निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार
सातारा : सत्ता गेल्याच्या नैराश्यातून महाविकास आघाडी महाराष्ट्रात दुही आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, राज्यातील जनताच त्यांना विधानसभा निवडणुकीत उत्तर देईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांचे प्रेमही बेगडी आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला, तसेच राज्यातील विधानसभा निवडणूक ठरलेल्या वेळेतच होईल, अशी पुष्टीही त्यांनी दिली.
सातारा येथे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग साेशल मीडिया बैठकीस आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.
भाजप प्रवक्ते उपाध्ये म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी बाब आहे. याचे कोणीच समर्थन करणार नाही. पण, महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. सध्या आघाडीतील तिन्ही पक्षांकडूनच गलिच्छ राजकारण सुरू आहे. उद्धवसेनेचे संजय राऊत म्हणतात महाराष्ट्र का पेटत नाही. चंद्रकांत खैरे यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडही आता इतिहास शिकवू लागलेत, हे हास्यास्पद आहे. आघाडीला राज्यात अशांतताच निर्माण करायची आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्याचे चुकीचे सांगितले जाते. आमच्या दृष्टीने शिवाजी महाराजांची ती स्वराज्य विजयाची मोहीम होती, असे सांगून उपाध्ये पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पण, विरोधक आंदोलन करतात. पंडित जवहरलाल नेहरू यांनीही शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे शब्द वापरले होते. शीख समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आलेल्या होत्या. याबद्दल सोनीया गांधी यांनी माफी मागितली होती. राहुल गांधी यांनीही न्यायालयात माफी मागितलेली. माफी मागणे पुरेसे नसेल, तर राहुल गांधींविरोधात कोणते आंदोलन करणार ते महाविकास आघाडीने स्पष्ट करावे.
आम्हाला शहाणपणा शिकवू नये..
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. विरोधकांनी शहाणपणा शिकवू नये, असा इशारा उपाध्ये यांनी दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या टीकेविषयी पत्रकारांनी प्रश्न केल्यावर उपाध्ये यांनी जे स्वत:चा पक्ष, कार्यकर्ते, आमदार सांभाळू शकत नाहीत. जे वडिलांच्या वारसापासून गेट आऊट झालेत. त्यांनी आम्हाला ‘गेट आऊट’ म्हणणे हास्यास्पद आहे, असा टोलाही लगावला.