तरडगावातील बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 01:05 PM2024-05-19T13:05:00+5:302024-05-19T13:06:35+5:30

 पुढील महिन्यात २९ जून  रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ८ जुलै रोजी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे.

The work of the bridge at the bus stand in Tardgaon is still incomplete | तरडगावातील बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत

तरडगावातील बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत

तरडगाव- पुढील महिन्यात २९ जून  रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ८ जुलै रोजी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. मात्र बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.तसेच काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. अशात हे काम पूर्ण होणार की नाही?  याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. पालखी तळ लगत पुलाचे काम पूर्ण होवून तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने सर्वाँना येथील दुसऱ्या पुलाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा लागली आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व त्यामधील चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण यामुळे अवघ्या राज्याला परिचित असणार  सांप्रदायिक गाव म्हणजे तरडगाव होय. आषाढी वारीतील पालखी सोहळ्याचा येथे एक दिवस मुक्काम असतो. वारीत सहभागी वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी दरवर्षी तात्पुरत्या योजना केल्या जातात. मात्र वर्षानुवर्षे बसस्थानक परिसरात रखडलेल्या कामामुळे  आजवर नागरिक व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

आळंदी - पंढरपूर - मोहोळ या पालखी मार्गाच्या सहापदरीकरण कामात तरडगाव मधील पालखी तळ लगत व बसस्थानक परिसर या दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले.सुरुवाती पासून संथ गतीने सुरू राहिलेल्या या कामातील पालखी तळ येथील पुलाचे काम पूर्ण होवून त्यावरून सध्या वाहतूक सुरू झाल्याचे दिसत आहे. मात्र बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही पूर्णावस्थेत न आल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.

सध्या अपूर्णवस्थेतील पुला शेजारून एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. काम संथगतीने सुरू राहिल्याने व्यवसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे. तर धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी अन् सुरू असलेल्या कामामुळे परिसर पूर्णतः बदलून गेल्याने बाहेरून एखादा प्रवाशी येथे आला तर बसस्थानक कुठे आहे? असा प्रश्न विचारताना तो दिसतो. 

काम पूर्णत्वास झाल्यावर समस्या दूर होतील मात्र सध्याची परिस्थिती पाहता नागरिक,प्रवाशी वर्ग ,व्यवसायिक यांचा विचार करता त्यांना भेडसावणाऱ्या इतर  अडचणी दूर करण्यासाठी व  वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. तसेच पालखी आगमनापूर्वी या पुलाचे काम पूर्ण न झाल्यास पालखी सोहळ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशी चर्चा होताना दिसत आहे.  

ते 'वळण ' होणार का सरळ?

२०१० पासून चौपदरीकरण रस्त्याच्या कामात रखडलेले  तरडगाव ओढया जवळील  अपघाती वळण अजून जैसे थे आहे. आजवर रात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडून यामध्ये अनेक जखमी झाले आहेत.तर काहीना जीवास मुकावे लागले आहे.अपघात झाल्यावरच यावर केवळ तात्पुरत्या उपाय योजना झाल्या आहेत.

'सबंधित विभागाने पालखी सोहळा व पावसाळा या गोष्टी लक्षात घेवून यापूर्वीच योग्य नियोजन करून पुलाच्या कामाची पूर्तता करणे आवश्यक होते.नैसर्गिक आपत्तीत अशी कामे सुरू ठेवणे शक्य नसते.काम पूर्ण न झाल्यास याचा फटका वारकऱ्यांसह सर्वांना बसेल.तो बसू नये याची दक्षता घेण्यात यावी.
                                       सतीश गायकवाड 
                                      संस्थापक अध्यक्ष
                              माऊली सेवा दल,तरडगाव

Web Title: The work of the bridge at the bus stand in Tardgaon is still incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.