वेळेत मदतीला आई धावली, पण मुलाचा जीव नाही वाचवू शकली; साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: February 28, 2023 03:11 PM2023-02-28T15:11:15+5:302023-02-28T15:12:33+5:30
नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही
सातारा : मुलाने घरातील जिन्याच्या खिडकीला गळफास घेतल्याचे आईच्या निदर्शनास येताच इतर नागरिकांच्या साथीने मुलाचा गळफास सोडून आईने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, सोमवारी (दि. २७) संगमनगर येथे घडली.
निखील नंदकुमार पाटील (वय २५, रा. वसुंदरा संगमनगर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निखील हा शहरातील एका महाविद्यालयात शिकत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी राहत्या घरातील जिन्याच्या खिडकीला त्याने गळफास घेतला.
यावेळी मोठा आवाज झाल्याने त्याची आई धावत जिन्यात गेली. निखीलने गळफास घेतल्याने आईने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. त्यांच्या मदतीने निखीलच्या गळ्याचा फास सोडून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार भिसे हे अधिक तपास करीत आहेत.