Satara: विवाहितेला पळवल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा खून; आई, भावावरही चाकूने वार; आरोपीस अटक
By संजय पाटील | Published: March 14, 2024 04:22 PM2024-03-14T16:22:44+5:302024-03-14T16:23:21+5:30
कऱ्हाड : विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला. तर आई व भावावरही सपासप ...
कऱ्हाड : विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला. तर आई व भावावरही सपासप वार करण्यात आले. सैदापूर, ता. कऱ्हाड येथील अंबक वस्तीवर बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी एकाला अटक केले आहे.
बाबा आळवंत मदने (वय ५०, मुळ रा. तडवळे-वडूज, ता. खटाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी विजय धर्मा जाधव (वय ५५, सध्या रा. सैदापूर, मुळ रा. शेणोली स्टेशन, ता. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा नोंद करुन पोलिसांनी त्याला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडवळे येथील बाबा मदने, त्यांची पत्नी इंदू, धाकटा मुलगा अजित हे सैदापुरातील अंबक वस्तीत संतोष देसाई यांच्या गुऱ्हाळगृहावर ऊसतोडीचे काम करतात. तर त्यांचा मोठा मुलगा अक्षय हाही गावातील सुरेश साळुंखे यांच्या गुऱ्हाळगृहावर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. त्याच गुऱ्हाळवर विजय जाधव हा कुटूंबासह मजुरी करतो. गत आठवड्यात अक्षयने विजय जाधव याच्या नात्यातील एका विवाहितेला पळवून नेले. त्याबाबतचा राग त्याच्या मनात होता. त्याच कारणावरुन तो मदने कुटूंबियांना वारंवार शिविगाळ, दमदाटी करीत होता.
बुधवारी रात्री विजय जाधव दुचाकीवरुन मदने यांच्या झोपडीजवळ आला. त्याने चिडून जावून इंदू यांच्यावर चाकूने सपासप वार केले. बाबा मदने यांच्या छातीत चाकू भोकसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अजितवरही त्याने चाकूने वार केले. खून केल्यानंतर आरोपी विजध जाधव हा तेथून निघून गेला. याबाबत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात विजय जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर तपास करीत आहेत.
आरोपीला पोलिसांनी शिताफीने पकडले
बाबा मदने यांचा खून केल्यानंतर आरोपी विजय जाधव तेथून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेवून अटक केली.