Satara: विंग येथील चोरी प्रकरण: वेशांतर करत पाठलाग करून पोलिसांनी चोरट्यास कर्नाटकातून घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 02:18 PM2023-09-06T14:18:23+5:302023-09-06T14:18:45+5:30
कारवाई दरम्यान स्थानिकांनी व नातेवाईकांनी विरोध करत पोलिसांवर हल्ला करण्याकरीता कुत्रे सोडले
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील विंग येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भिवंडी येथील गोडाऊनमध्ये घेऊन जाण्याकरीता फ्रीज, वाॅशिंग मशीनसह कंटेनर असा २१ लाख ८७ हजार १५३ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी परराज्यांतील सराईत गुन्हेगार असलेल्या चालकाच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी आवळल्या. सलग तीन दिवस कर्नाटकातील बेगम तालाब तांडा येथे वेशांतर करत पाठलाग करून संबंधिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कंटेनरसह १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विंग येथील एका कंपनीमध्ये उत्पादित होणारे फ्रीज भिवंडी येथील गोडाऊनमध्ये घेऊन जाण्याकरीता कल्याण, ठाणे येथील ट्रान्स्पोर्टतर्फे कंटेनर (एनएल ०१ एडी ००६५) हा १४ जूनला आला होता. कंटेनरमध्ये ५८ फ्रीज, ५६ वाॅशिंग मशीन भरून कंटेनरचालक अशोक वेणू चव्हाण हा १५ जूनला भिवंडीकडे न जाता गायब झाला. याबाबत कंटेनरमालक मनोज सिंह (ठाकूर) यांनी फर्याद दिली होती. त्यानुसार शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल बारेला यांच्या पथकाने आनेवाडी, तासवडे टोलनाका, पेठ नाका कोल्हापूर, विजापूर, लमाण तांडे येथील सीसीटीव्हीची तपासणी केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना कंटेनरमधील फ्रीज, वाॅशिंग मशीन विजापूर तालुक्यातील लमाण तांडा परिसरात चालक अशोक चव्हाण याने विविध ठिकाणी विकल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी मोहीम राबवत वेशांतर करीत गुन्ह्यात सहभागी असलेल्या अशोक चव्हाण याच्या पाठलाग करीत मुसक्या आवळल्या.
अशोक चव्हाण याला अटक करत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने बुधवारी (दि. ६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामध्ये संबंधितांकडून शिरवळ पोलिसांनी कंटेनर, फ्रीज, वाॅशिंग मशीनसह १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करत आहे.
कुत्र्यांचा हल्ला व सराईत गुन्हेगार जेरबंद..
पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक देसाई, पोलीस अंमलदार तुषार अभंग, अजित बोराटे यांच्या पथकाने सुतावरुन स्वर्ग गाठत कर्नाटकमध्ये अतिसंवेदनशील बेगम तालाब तांडामध्ये कारवाई केली. अशोक चव्हाण हा तेथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर करत थरारक पाठलाग केला. यावेळी स्थानिकांनी व नातेवाईकांनी विरोध करत पोलिसांवर हल्ला करण्याकरीता कुत्रे सोडले. मोठ्या शिताफीने पोलिसांनी बचाव करत अशोक चव्हाण याला पकडले.