सोने खरेदीच्या बहाण्याने साताऱ्यात २ ज्वेलर्समध्ये १.७९ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:45 AM2024-05-13T11:45:29+5:302024-05-13T11:46:21+5:30
महिलेसह तिघांवर गुन्हा; हातचलाखी सीसीटीव्हीत कैद
सातारा: शहरातील दोन ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदी करण्याचा बहाणा करून एक महिला व दोन पुरुषांनी पावणेदोन लाखाचे दागिने हातोहात लांबविले. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची शनिवारी रात्री उशिरा पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका ज्वेलर्समध्ये एक तरूण गळ्यातील चेन खरेदी करायची आहे, असे सांगून आला. महिला कर्मचारी त्याला काऊंटरवर चेन दाखवत असताना त्याने हातचलाखी करून सोन्याचा हातातील सरदारी कडा चाेरून नेला. हा प्रकार दि. १० रोजी रात्री नऊ वाजता घडला. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. सोन्याच्या कड्याची किंमत १ लाख ४६ हजार रुपये आहे. या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, आणखी एका ज्वेलर्सच्या दुकानात एक महिला व पुरुष गेला. दागिने खरेदीचा बहाणा करून त्या दोघांनी ३३ हजारांचे ४ ग्रॅम ९६० मिली वजनाचे सोन्याचे टाॅप्स चोरून नेले. ही घटना दि. १० रोजी दुपारी बारा वाजता घडली. या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस नाईक साबळे हे अधिक तपास करीत आहेत.