केवळ मित्राच्या इच्छेसाठी मोबाईलची जबरी चोरी -साताऱ्यात दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:52 PM2018-06-16T21:52:50+5:302018-06-16T21:52:50+5:30
सातारा : मोबाईल खरेदी करण्यासाठी वेटर मित्राकडे पैसे नसल्याने रस्त्याने मोबाईलवर बोलणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी शनिवारी दोन तरुणांना ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. दीपक शामराव पेटेकर (वय २२, रा. आसरे, ता. कोरेगाव) व अक्षय रमेश म्हेत्रे (२१, रा. कुमठे फाटा, कोरेगाव) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, दीपक पेटेकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोरेगाव, सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊही मोक्कातील आरोपी आहे. अक्षय उंब्रज येथील एका हॉटेलमध्ये नोकरीला असून, त्याला मोबाईल खरेदी करायचा होता. मात्र, त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. ही बाब त्याने दीपकला सांगितली. दीपकने आपल्या मित्राची समस्या सोडवण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोलत चाललेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात मुमताज शरीफ सय्यद (वय ३०, रा. शनिवार पेठ, सातारा) या महिलेने मोबाईल व सोन्याच्या चेनची जबरी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. सी. पोरे यांचे पथक गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. दरम्यान, शनिवारी दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मोबाईलची जबरी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी मोबाईल व चोरीसाठी वापरलेली दुचाकी (एमएच ११ सीएन १५६९) असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एस. सी. पोरे अधिक तपास करीत आहेत.
या कारवाईत पोलीस नाईक संतोष महामुनी, भिसे, मुल्ला, नीलेश गायकवाड, साळुंखे, भोसले, अनिल स्वामी, अविनाश चव्हाण, ढाणे, धीरज कुंभार, भिसे यांनी सहभाग घेतला होता.
सोन्याच्या चेनची चोरी झालीच नव्हती...
तक्रारदार महिला कामाहून घरी येत होती. अंधारात चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावला. मात्र, पोलीस मोबाईल चोरीची तक्रार घेणार नाहीत म्हणून तिने सोन्याची चेन चोरी झाल्याचे सांगितले. पोलीस तपासात चेनची चोरी झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर संबंधित महिलेने फक्त मोबाईलची चोरी झाल्याची कबुली दिली.