हातचलाखी, सराफी दुकानातून सहा तोळ्यांचे गंठण केलं लंपास; फलटणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 04:48 PM2022-04-11T16:48:56+5:302022-04-11T16:49:15+5:30
सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्यांची दिशाभूल करून हातचालाखीने सहा तोळ्यांचे गंठण केलं लंपास
फलटण : सोने खरेदी करण्याचा बहाण्याने अनोळखी दोन महिला व एका पुरुषाने हात चलाखीने सराफी दुकानातून सहा तोळ्यांचे गंठण लंपास केले. लंपास केलेल्या या गंठणाची किंमत २ लाख ९२ हजार रुपये होते. फलटण शहरातील एका सोन्याच्या दुकानात हा प्रकार घडला.
येथील शांतीकाका सराफ अँड सन्स या दुकानातील सर्व कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुकान उघडून हिशोब केला असता ६ तोळे वजनाचे २ लाख ९२ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे गंठण दिसून येत नाही, असे कर्मचाऱ्यांनी मालकांना सांगितले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये आदल्या दिवशी दुपारी १२. ४० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला व एक पुरुष यांनी सोन्याचे गंठण घ्यावयाचे आहे, असे सांगितल्याने त्यांना काऊंटरवर सेल्समन गंठण दाखवीत होते. सेल्समन यांनी त्यांना सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे गंठण दाखविले.
सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्यांची दिशाभूल करून हातचालाखीने त्यातील एका महिलेने ते गंठण तिचे एका हातातील पर्सखाली लपवून दुसरीच्या हातामध्ये दिल्याचे दिसले. त्यानंतर ते अनोळखी तिघेजण त्या दुकानातून काही एक खरेदी न करता घाईगडबडीमध्ये बाहेर निघून गेले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यानंतर नितीन शांतीलाल गांधी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुष यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.