पाॅलिसच्या बहाण्याने लाखाचे दागिने लांबविले, अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:43 PM2022-09-22T16:43:18+5:302022-09-22T17:11:22+5:30
हातचलाखी करून दागिने घेवून पोबारा केला
सातारा : दागिन्यांना पाॅलिस करून देतो, असे सांगून एका महिलेचे लाखाचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना खिंडवाडी, ता. सातारा येथे बुधवार, दि. २१ रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन युवकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांता गोविंद येवले (वय ५०, रा. खिंडवाडी, ता. सातारा) या घरात असताना दोन अनोळखी युवक तेथे आले. त्या युवकांनी दागिन्यांना पाॅलिस करून देतो, असे सांगितले. त्यामुळे येवले यांनी घरातील सोन्याची माळ, कर्णफुले, कानातले वेल असे लाखाचे दागिने त्यांच्याजवळ दिले. त्या युवकांनी एका भांड्यात दागिने ठेवून पाॅलिस करण्याचा बहाणा केला.
त्यानंतर हातचलाखी करून भांड्यातील दागिने काढून त्यांनी पोबारा केला. ते दोघे निघून गेल्यानंतर येवले यांनी भांड्यात दागिने पाहिले असता भांड्यामध्ये काहीच नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. हवालदार दगडे हे अधिक तपास करीत आहेत.