शिवरूपराजे यांच्या आसू येथील घरातून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:13+5:302021-08-01T04:36:13+5:30
फलटण : आसू, ता. फलटण येथे सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांच्या ...
फलटण : आसू, ता. फलटण येथे सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांच्या बंगल्यातील कपाटातून रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असा १५ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याबाबतची फिर्याद शिवरूपराजे खर्डेकर यांंनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी जास्त पैशांची गरज असल्याने त्यांनी दि. ६ जुलै रोजी ७ लाख रुपये आसू येथील राहत्या घरातील बेडरूमच्या आतील बाजूला असणाऱ्या खोलीतील लोखंडी कपाटात ठेवले होते. त्यानंतर दि. १२ जुलै रोजी हे कपाट उघडून पाहिले असता ही सर्व रक्कम दिसली नाही. या रकमेबाबत घरातील लोकांना तसेच त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या लोकांकडे चौकशी केली; परंतु या रकमेच्या चोरीबाबत कोणालाच माहिती नव्हती.
त्यानंतर दि. २९ जुलै रोजी त्यांच्या सूनबाई संयुक्ताराजे यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या बेडरूमच्या आतील बाजूस असणाऱ्या लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे मणी, मंगळसूत्र, डायमंडचा नेकलेस, सोन्याची चेन व रोख रक्कम ५० हजार रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने चावीने उघडून चोरून नेल्या व पुन्हा कपाट बंद करून ठेवले. त्यानंतर १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार शिवरूपराजे खर्डेकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत हे करीत आहेत. या चोरीच्या प्रकारामुळे फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे