घरचे लोक दुचाकी घेऊन देत नसल्याने मुलाने केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:00 PM2019-07-29T14:00:32+5:302019-07-29T14:02:24+5:30
घरचे लोक दुचाकी घेऊन देत नसल्याने एका अल्पवयीन मुलाने चक्क दुचाकीची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अल्पवयीन मुलाला दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.
सातारा : घरचे लोक दुचाकी घेऊन देत नसल्याने एका अल्पवयीन मुलाने चक्क दुचाकीची चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अल्पवयीन मुलाला दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरीतील रत्नमणी सोसायटीमध्ये राहणाऱ्या विना उपचंद बाफना (वय ४५) या बुधवार, दि. १७ रोजी सकाळी दुचाकीवरून (एमएच ११ बीक्यू ७७४९) राजवाड्याकडे येत होत्या. यावेळी पिवळा टी शर्ट परिधान केलेल्या एका युवकाने त्यांची दुचाकी अडवली. बोलण्याचा बहाणा करून त्याने काही क्षणातच खिशातील चाकू बाहेर काढला. त्यांना धमकावत दुचाकी घेऊन त्याने पलायन केले होते.
या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली होती.
दरम्यान, रविवारी सकाळी संबंधित मुलगा जुना आरटीओ चौकात दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांना गुंगारा देऊन दुचाकीसह पलायन केले. अखेर शाहूपुरी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला त्याच्या वडिलांसमोरच पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दिलेले उत्तर ऐकून पोलीस अवाक् झाले.
माझ्याकडे सायकल आहे. परंतु माझ्या घरातील लोक मला दुचाकी घेऊन देत नव्हते. मला दुचाकी फिरविण्याची हौस होती म्हणून मी दुचाकी चोरली असल्याचे त्याने पोलिसांकडे कबुली दिली. हल्लीची मुले आपला हट्ट पुरविण्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याचे पाहून पोलिसही चक्रावून गेले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगूट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, अमीत माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्निल कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, संतोष भोसले यांनी ही कारवाई केली.