रुग्णाच्या जीवापेक्षा त्यांची घाई महत्त्वाची!

By admin | Published: May 18, 2016 10:18 PM2016-05-18T22:18:04+5:302016-05-19T00:10:21+5:30

समर्थ मंदिर चौक : सायरन वाजवणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबावे लागतंय रस्त्याची वाट पाहत

Their fastness is more important than the patient's stairs! | रुग्णाच्या जीवापेक्षा त्यांची घाई महत्त्वाची!

रुग्णाच्या जीवापेक्षा त्यांची घाई महत्त्वाची!

Next

सातारा : धकाधकीच्या जीवनात कधी कोणावर कोणती वेळ येईल, याचा नेम नाही. अशा रुग्णांना काही वेळेत रुग्णालयात पोहोचविण्याचे काम रुग्णवाहिका करत असतात. परंतु रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून देण्याचा सुज्ञपणा अद्याप तरी सातारकरांमध्ये आलेला दिसत नाही. समर्थ मंदिर ते ढोल्या गणपती या दरम्यानचा रस्ता ओलांडण्यासाठी रुग्णवाहिकेला कित्येक वेळ थांबावे लागले.
सातारकरांचा उर भरून येईल, अशी घटना या आठवड्यात घडली होती. वाई येथील व्यापारी चंपालाल ओसवाल यांचा मुलगा मनीष (वय ३०) हा मंगळवारी रात्री दुचाकी घसरल्याने जखमी झाला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने सुरुवातीला साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी सांगितलं, ‘पेशंट जगणं अवघड आहे.’ तेव्हा काळजावर दगड ठेवून त्याच्या आईनं निर्णय दिला, ‘ माझ्या मुलाचं हृदय, लिव्हर, किडनी, हात अन् डोळे दान करा !’... त्याच्या मृत्यूनंतर हृदय काढून तत्काळ मुंबईला पाठविण्यात आलं.
त्यामुळे अनेक रुग्णांच्या रूपाने मनीष अजरामर झाला आहे. त्याचवेळी मनीषचं हृदय पुण्याहून मुंबईला १८० किलोमीटरचं अंतर अवघ्या दीड तासात नेण्यात आलं. मिनिटांना दोन किलोमीटरचा प्रवास करून रुग्णवाहिकेने मोलाचे काम केले होते. त्यामध्ये वाहतूक शाखेनेही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती.
या घटनेतून तरी सातारकरांनी स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज होती. सातारा येथील समर्थ मंदिर परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन तेथील एसटीचा थांबा पुढे हलविला आहे. आता काही अंशी ताण कमी झाला आहे. याच ठिकाणी मंगळवारी सायंकाळी एक रुग्णवाहिका बोगद्याच्या दिशेने मोठ-मोठ्याने सायरन वाजवत येत होती. त्या सायरनचा आवाज किमान सातशे-आठशे मीटरवर ऐकू येत होता. या आवाजाने काही वाहने बाजूला झाली; परंतु,समर्थ मंदिराजवळ रस्त्याच्या कडेलाच गाड्या उभ्या करून गप्पा मारत थांबलेल्यांना याचं गांभीर्य समजलंच नाही. रुग्णवाहिका त्यांच्याजवळ आली तरी गाडीवरून उतरून ती बाजूला घेण्याचं कष्ट घेण्यात आले नाही. सारेजण त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा मोटारसायकल थोडीशी तिरकी करून रस्ता दिला.
तेथून थोडी पुढे गेली, तर एका कारला मंगळवार पेठेकडे जायचे असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेला थांबावे लागले. सर्वात दुर्दैवी घटना ढोल्या गणपतीच्या अलीकडे घडली. त्याठिकाणी पालिकेकडून आलेल्या वाहनाला राजवाड्याकडे जायचे होते. दुसरे वाहन राजवाड्याकडून येऊन पालिकेकडे जाण्यासाठी वळण घेत होती.
दोन्ही वाहने आमनेसामने आल्याने इतर वाहने थांबली होती. त्यातून वाट काढून रुग्णवाहिका काही वेळेत या वाहनांजवळ आली. रुग्णवाहिकेचा वेग कमी झालेला पाहून राजवाड्याकडून आलेल्या दुचाकीस्वाराने बोगद्याकडे जाण्यासाठी जीप व रुग्णवाहिका या दोन वाहनांच्या मधून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरील वाहने निघून गेले; पण दुचाकी बाजूला जाईपर्यंत रुग्णवाहिकेला वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे, तोपर्यंत सायरन वाजतच होता.
आपले काम कितीही महत्त्वाचे असले तरी सायरन वाजवत येत असलेल्या वाहनांना प्राधान्याने वाट काढून देण्याची जबाबदारी प्रत्येक वाहनचालकाची आहे. वाहनचालकांनी सुज्ञपणा दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

कितीही गर्दी असली, सिग्नल पडलेला असला तरी प्रसंगी हाताने वाहतूक थांबवून रुग्णवाहिकेला प्राधान्य देण्याच्या सूचना वाहतूक शाखेच्या पोलिसांना केल्या आहेत. चौकात रस्ता देण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांतून प्रबोधन केले जाईल.
- सूरज घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक,
वाहतूक शाखा, सातारा

होऊ नये, ‘लांडगा आला रे...’
रुग्ण नसतानाही काही रुग्णावाहिकांचे चालक चौकातून लवकर मार्ग निघावा म्हणून सायरन वाजवत जात असतात, असा तक्रारीचा सूर काही वाहनचालकांमधून येत आहे. त्यामुळे अनेकदा अशा रुग्णवाहिकांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या चालकांनी आवश्यक तेव्हाच सायरनचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा ‘लांडगा आला रे...’ अशी अवस्था होऊ शकते. अतिगंभीर रुग्ण असायचा; पण रिकामीच असेल, असा समज करून ती अडकून बसायला नको.

Web Title: Their fastness is more important than the patient's stairs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.