...तर ढाबामालकांना अटक शक्य
By admin | Published: July 24, 2015 10:15 PM2015-07-24T22:15:03+5:302015-07-25T01:13:29+5:30
पोलिसांचा इशारा : तालुका हद्दीतील आठ हॉटेलांवर कारवाई
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे रात्री दहानंतर सुरू राहणाऱ्या, तसेच इतर तांत्रिक बाबींची पूर्तता नसणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ढाब्यांवर ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे. मात्र, तरीही यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित ढाबामालकावर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री दहानंतर सुरू राहणाऱ्या ढाब्यांवर बुधवारी रात्री कारवाई करण्यात आली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गेल्या दोन दिवसांत आठ ढाबे-हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सोनगावजवळील हॉटेल शिवार, खिंडवाडीजवळील राजस्थानी ढाबा, वाढेजवळील हॉटेल हिंदवी स्वराज्य, हॉटेल स्वाद, निसर्ग ढाबा, रहिमतपूर रस्त्यावरील ओमकार हॉटेल, तसेच हॉटेल जायका आणि हॉटेल समर्थ कृपा या हॉटेल-ढाब्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू झाले आहे. या कलमान्वये त्या-त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. सध्या ज्या ढाब्यांवर कारवाई झाली आहे, ती मुंबई पोलीस कायद्यानुसार झालेली दंडात्मक कारवाई आहे. परंतु यानंतर नियमभंग झाल्यास भारतीय दंडविधानाच्या कलम १८८ नुसार संबंधिताला अटकही होऊ शकते, असे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मद्यपान? अजामीनपात्र गुन्हा!
अनेक ढाबे-हॉटेलांना दारूविक्रीचा परवाना नसतो; मात्र अनेकजण तेथे बसून मद्यसेवन करीत असल्याचे आढळून येते. काही ठिकाणी छुपेपणाने मद्य पुरविले जाते, तर काही ठिकाणी संबंधित शौकिन बाहेरून मद्य घेऊन येतात आणि ढाब्यावर सेवन करतात. पोलिसांच्या कारवाईत असे आढळून आल्यास संबंधित ढाबामालकावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.