...तर पाच एप्रिलला सहकार आयुक्तांना घेराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:38 AM2021-03-26T04:38:42+5:302021-03-26T04:38:42+5:30
कराड : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक एप्रिलला साखर आयुक्त कार्यालयात जाऊन राज्यातील थकित एफआरपीचा आढावा घेणार ...
कराड : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक एप्रिलला साखर आयुक्त कार्यालयात जाऊन राज्यातील थकित एफआरपीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. जे कारखाने थकित असतील त्यांच्यावर कारवाई करतो, असाही शब्द दिला आहे. त्यामुळे आजचे आंदोलन थांबले आहे. मात्र याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही, तर पाच एप्रिलला सहकार आयुक्तांना घेराव घालणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कऱ्हाड येथे दिला.
शेट्टी म्हणाले, खरं तर आज आम्ही सहकारमंत्र्यांच्या कारखान्यावर सनदशीर मार्गाने आंदोलन करणार होतो. पण, हे आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला; दडपशाही केली, ही बाब चुकीची आहे. मात्र पुढील आंदोलन हे गनिमीकाव्याने होईल व तुम्हाला धमाका पाहायला मिळेल.
वास्तविक १७ हजार कोटी रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे शासनाकडून येणे आहे. याला जबाबदार कोण? आणि याउलट वीजबिले भरली जात नाहीत म्हणून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स तोडली जात आहेत. त्यांचा परिवार अंधारात राहत आहे. त्यांच्या मुलांच्या परीक्षा आहेत, याचा विचार शासन करताना दिसत नाही. ही बाब गंभीर असून, याचे परिणाम येणाऱ्या काळात सरकारला भोगावे लागतील.
सहकारी साखर कारखान्यांनी कर्ज घेतली अन् त्याची वेळेत परतफेड झाली नाही, तर सरकार त्याची हमी घेते. मग आमचे कारखानदारांकडून सुमारे २८ हजार कोटींचे येणे आहे. तरीही वीज तोडली जात आहे. मग सरकारने आमचीही हमी घ्यावी, असे मी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना बोललो; पण ते निरुत्तर झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
चौकट
... तर मी न्यायालयात जाणार
सध्या काही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत; तर काहींच्या होऊ घातल्या आहेत. पण ज्यांनी एफआरपी दिली नाही, ते कारखाने सरकारचे थकबाकीदार आहेत. त्यांचे रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट तपासून निवडणुकीतील अर्ज अपात्र करावेत, अशी मागणी मी साखर आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी तसा योग्य निर्णय न घेतल्यास मी न्यायालयात दाद मागणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
फोटो :आयकार्ड