माणुसकीने-प्रेमाने सांगण्याची वेळ गेली; आता, कायदा आणि नियम याचाच धाक दाखविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 06:05 PM2020-04-27T18:05:47+5:302020-04-27T18:25:15+5:30
आत्तापर्यंत जिल्ह्यात लागण झालेले २१ रुग्ण आढळले. यातील प्राथमिक लागण झालेला एकही रुग्ण स्थानिक नाही. कोणी दुबईवरून आले, कोणी कॅलिफोर्नियातून, कोणी मुंबईहून तर कोणी पुण्यातून. प्रवास करू नका, बाहेर जाऊ नका, असे कितीही सांगितले तरी मनावर कोण घेतं.
दीपक शिंदे ।
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला तसा जिल्ह्याच्या सीमा लॉक करण्यात आल्या; पण या लॉकचा प्रभाव काही दिसून आला नाही. सब लॉक तरीही सबकुछ खुला, अशीच स्थिती पाहायला मिळते. बरोबर एक महिन्यापूर्वी २३ मार्चला जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही ३८९ होती. एक महिन्यानंतर आता २३ एप्रिल रोजी ही संख्या ११७३ आहे. याचाच अर्थ कोणीतरी दरवाजा खुला सोडत आहे.
जिल्ह्याच्या बाहेरून येणा-या आणि विशेषत: पुणे, मुंबईवरून येणाºया लोकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो. यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातून कोणालाही बाहेर जाता येत नाही आणि कोणालाही आत येता येत नाही. तरी देखील सुमारे साडेसातशे लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शासकीय आकडेवारीच रोज बदलत आहे. दररोज जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे हे लोक येतात तरी कोठून? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
आत्तापर्यंत जिल्ह्यात लागण झालेले २१ रुग्ण आढळले. यातील प्राथमिक लागण झालेला एकही रुग्ण स्थानिक नाही. कोणी दुबईवरून आले, कोणी कॅलिफोर्नियातून, कोणी मुंबईहून तर कोणी पुण्यातून. प्रवास करू नका, बाहेर जाऊ नका, असे कितीही सांगितले तरी मनावर कोण घेतं. या हेकेखोरीमुळे एक महिन्यात एकाचे एकवीस झाले. कºहाड आणि जावळी तालुक्यातील बाधितांमुळे ही संख्या आणखी वाढली.
योग्य खबरदारी आणि लोकांचा संपर्क टाळणे अशा प्राथमिक गोष्टी पाळणे गरजेचे आहे; पण त्यामध्येही नागरिक गंभीर नाहीत. त्यामुळेच अशा उद्रेकाला सामोरे जावे लागते. अजूनही सावरण्याची वेळ आहे. क-हाड आणि मलकापूर पूर्ण बंद केले गेले आहे. जिल्ह्यात थोडीफार उसंत आहे; पण हे प्रमाण वाढले तर तालुकेही लॉकडाऊन करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने ही नाकेबंदी आणखी कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासन अजूनही दाखवतंय माणुसकी
लोकांची अडचण व्हायला नको म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघेही अजूनही माणुसकी दाखवून सर्वांना विनवणी करत आहेत. काही पाच-दहा टक्के लोकांमुळे अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत आहेत; पण या पाच दहा टक्क्यांना सुधारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक स्वत:च रस्त्यावर उतरल्या आहेत. आता माणुसकीने आणि प्रेमाने सांगण्याची वेळ निघून गेली आहे. आता, कायदा आणि नियम याचाच धाक दाखविण्याची गरज आहे.
जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी पासची प्रतीक्षा
सातारा जिल्ह्यात बाहेरून येणाºया लोकांना बंदी आहे. त्याप्रमाणेच पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही जाता येत नाही. त्यामुळे एका जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी पास दिला तरी दुसºया जिल्ह्यातील यंत्रणा जिल्हाबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करू शकते. त्यामुळे पोलीस अधीक्षक पातळीवरून कोणालाच जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अनेकजण गेल्या एक महिन्यापासून पास मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या महिनाभरात बाहेरून आलेले प्रवासी
२१ मार्च
267
२५ मार्च
411
३१ मार्च
543
५ एप्रिल
666
१० एप्रिल
835
१५ एप्रिल
917
२० एप्रिल
1087
२४ एप्रिल
1214