फलटण शहरात ३२ ठिकाणी ७४ कॅमरे
By Admin | Published: February 5, 2016 12:55 AM2016-02-05T00:55:03+5:302016-02-05T00:58:59+5:30
‘सेफ सिटी’ योजनेत समावेश : रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
फलटण : राज्य शासनाच्या सेफ सिटी योजनेत फलटण शहराचा समावेश करून त्यासाठी नाविण्यपूर्ण योजना व अन्य ठिकाणाहून निधीची तरतूद करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर शहरातील ३२ ठिकाणे निश्चित करून तेथे ५२ फिक्स व २२ फिरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
मुंबईत बुधवारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, फलटणचे उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नियोजन अधिकारी पाटील, फलटणचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, शहर अभियंता मारुती पाटील उपस्थित होते.
फलटण शहराचा वाढता विस्तार, वाढते औद्योगिक क्षेत्र, व्यापारातील वाढ, वाढत्या शैक्षणिक सुविधा यामुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, अपघातात वेळेवेर वैद्यकीय व इतर सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाची प्राथमिक स्वरूपाची योजना स्वीकारण्यात आली.
मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी व सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुरक्षिततेबाबत तयार केलेल्या अहवालावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार शहरातील ३२ ठिकाणे निश्चित करून ५२ स्थिर तर २२ फिरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. आपत्ती किंवा वाहतूक अथवा एखाद्या उत्सवातील मिरवणुकीदरम्यान सहभागी नागरिकांना सूचना देण्यासाठी किंवा घटनेची माहिती देण्यासाठी शहरातील काही मोक्याच्या जागेवर ध्वनीवर्धक लावणे. शहरातील रुग्णालये, रुग्णवाहिका व स्वयंसेवी संस्था यांचे संपर्क क्रमांक व त्यांच्याकडून होऊ शकणाऱ्या अपेक्षित मदतीबाबत माहिती संकलित करून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)