माण-खटावची बारामती झालीच नाही

By admin | Published: August 31, 2015 09:02 PM2015-08-31T21:02:15+5:302015-08-31T21:02:15+5:30

येळगावकर : शरद पवारांनी दाखविलेलं स्वप्न फोल ठरल्याची टीका

There has been no conclusion of the scam | माण-खटावची बारामती झालीच नाही

माण-खटावची बारामती झालीच नाही

Next

सातारा : शरद पवार हे माढाचे खासदार झाल्यानंतर त्यांनी माण-खटावला बारामती बनविण्याचं दाखविलेलं स्वप्न फोल ठरल्याची टीका माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केली. त्यांच्या नेतृत्वामुळे दुष्काळी जनता स्वप्नात रमली. तरुणपणात जे जमलं नाही, ते आता उतारवयात करण्याची बुद्धी त्यांना सुचली आहे,’ असा घणाघातही त्यांनी केला. ‘ते शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करत असल्याने आम्ही त्यांचे स्वागत करतो,’ अशी टिप्पणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांवरही जोरदार शरसंधान साधले. ‘सातारा जिल्ह्याच्या वाटणीचे पाणी इतर जिल्ह्यांत पळविले जात असताना जिल्ह्यातील एकाही आमदाराला विरोध करण्याची बुद्धी सुचलेली नाही. आता त्यांच्या नेत्यांच्या मोर्चाला गर्दी जमेना म्हणून उतारवयात खुद्द शरद पवारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. खटाव-माण तालुक्यांत भयान परिस्थिती असतानाही सांगलीला पाणी पळविण्याचा डाव काहीनी आखला होता. उरमोडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये वर्गणी भरली असूनही त्यांना पाणी मिळत नाही.’ राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन्ही पक्षांकडे सत्ता सलग १५ वर्षे होती, त्यांना जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही. टेंभू बैठक कऱ्हाडमध्ये सुरू असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एकही आमदार या बैठकीला हजर राहिला
नव्हता, यावरूनच त्यांची पाणी प्रश्नावरील गांभीर्य त्यांना नसल्याचे समोर येते. (प्रतिनिधी)


दोन्ही तालुक्यांच्या पूर्व भागावर अन्याय
माण-खटाव तालुक्यांच्या पूर्वभागात कुठल्याही पाणी योजनेचं पाणी मिळालेलं नाही, त्या ठिकाणी टेंभू योजनेचं पाणी नेता आलं असतं. कृष्णा नदीची उपनदी असणाऱ्या येरळा नदीच्या खोऱ्यात हा भाग येतो, त्यामुळे रिव्हर बेसीननुसार पाणी वाटप करण्याच्या धोरणाला टेंभू योजनेत हरताळ फासण्यात आला.
चारा छावण्यांसाठी खडसेंना निवेदन
खटाव-माण तालुक्यांत टंचाई जाहीर करून चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी महसूल, मदत पुनर्वसन व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. त्यानंतर खडसेंनी स्वत: या विभागाच्या उपसचिवांना सातारा जिल्ह्यातील टंचाईच्या स्थितीचा अहवाल मागविला. ते स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत बोलल्याचे येळगावकर म्हणाले.


पाणी पळविण्याचा
डाव केबिनमधून!
कृष्णा खोरे नियामक मंडळाची बैठक चक्क माजी मंत्री पतंगराव कदमांच्या केबिनमध्ये सुरू होती. या बैठकीत आपण स्वत: गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे येळगावकर म्हणाले. या बैठकीतून उरमोडीचे पाणी सांगलीकडे पळविण्याचा डाव आखला जात होता. पिण्यासाठी पाणी नेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले; पण पिण्याच्या पाण्यासाठी ४० किलोमीटरचा कॅनॉल कशासाठी खोदला जात आहे?, असा सवाल या बैठकीत आपण उपस्थित केल्याचे येळगावकर म्हणाले.

Web Title: There has been no conclusion of the scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.