Satara: अर्धांगवायूचा झटका, बांबूचं डालगं अन् सात किलोमीटरची पायपीट!, मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळचं विदारक चित्र

By सचिन काकडे | Published: August 4, 2023 01:14 PM2023-08-04T13:14:55+5:302023-08-04T13:15:31+5:30

घोणसपूरमधील ‘त्या’ महिलेवर महाडमध्ये उपचार

There is neither road nor health center in Ghonsapur village, Distressing situation near the Chief Minister's village | Satara: अर्धांगवायूचा झटका, बांबूचं डालगं अन् सात किलोमीटरची पायपीट!, मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळचं विदारक चित्र

Satara: अर्धांगवायूचा झटका, बांबूचं डालगं अन् सात किलोमीटरची पायपीट!, मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळचं विदारक चित्र

googlenewsNext

सचिन काकडे

सातारा : एका वृद्ध महिलेला अर्धांगवायूचा झटका येतो... गावात दवाखाना नसल्याने तिला बांबूच्या डालग्यात बसवलं जातं... दगड- धोंडे, घसरड्या वाटा अन् पावसाचा मारा झेलत त्या महिलेला एक दोन नव्हे, तर सात किलोमीटरचा प्रवास करून दवाखान्यात नेलं जातं... ही कुठल्या चित्रपटाची कथा नसून, महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गावात घडलेली खरीखुरी घटना आहे. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचे गावही याच परिसरात आहे. वर्षानुवर्षे या भागातील ही स्थिती बदललेलीच नाही.

घोणसपूर हे गाव अतिदुर्गम भागात वसले असून, या गावात जाण्यासाठी ना रस्ता आहे, ना आरोग्य केंद्र. गावातील एखादी व्यक्ती, महिला आजारी पडल्यास रुग्णासह गावकऱ्यांना तब्बल दीड तास पायपीट करून दूधगाव गाठावे लागते. इथून पुढे मिळेल त्या वाहनाने महाबळेश्वर अथवा पोलादपूर, महाड येथील रुग्णालयात हलवावे लागते. गुरुवारी सकाळी गावात राहणाऱ्या कुसुम संभाजी जंगम (६५) या वृद्धेला अर्धांगवायूचा झटका आला. वृद्धेला तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. कुटुंबीय व गावकऱ्यांनी वेळ न दवडता कुसुम जंगम यांना बांबूच्या डालग्यात बसवलं. पाऊस लागू नये म्हणून त्यांच्या अंगावर प्लास्टिक कागद झाकला अन् गावकऱ्यांचा दवाखान्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.

पावसामुळं जंगलातील पायवाटा घसरड्या झाल्या होत्या. डालगं खांद्यावर घेऊन ग्रामस्थ या वाटा व दगड- धोंड्यांतून कशीबशी वाट काढत पुढं येत होते. दीड तासात सुमारे सात किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर ग्रामस्थांनी दूधगाव गाठलं. इथं आल्यानंतर त्यांनी एका वाहनातून कुसुम जंगम यांना महाबळेश्वरला उपचारासाठी नेलं. इथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना महाड येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. आता त्यांची प्रकृती समाधानकारक आहे, असं नातेवाइकांनी सांगितलं.

भारत चंद्रावर; पण आमचं गाव पारतंत्र्यात

भारत एकीकडं लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर यान उतरवू पाहत आहे; परंतु इथं जमिनीवर राहणाऱ्या, हजारो संकटं अंगावर झेलणाऱ्या हाडा- मांसाच्या माणसांना साध्या भौतिक सुविधा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. घोणसपूर ग्रामस्थ आजही पारतंत्र्यात असल्यासारखे जीवन जगत आहेत. ग्रामस्थांनी सलग १५ वर्षे श्रमदान करून कच्चा रस्ता तयार केला. मात्र, पाऊस- पाण्यापुढे तो तग धरत नाही. मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळच ही विदारक परिस्थिती असून, आम्ही जगायचं तरी कसं? अशा व्यथा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

आमची माणसं घोरपडीसारखी चिवट आहेत, म्हणून ती टिकून आहेत; पण दुर्गम भागात राहणाऱ्या या लोकांनी सहन तरी किती करायचं. प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आम्ही २००२ पासून करत आहोत; परंतु आमच्या मागणीची दखल गांभीर्यानं घेतली जात नाही. -डॉ. कुलदीप यादव, दूधगाव, ता. महाबळेश्वर

Web Title: There is neither road nor health center in Ghonsapur village, Distressing situation near the Chief Minister's village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.