उदयनराजे यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही : गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:14 PM2024-03-18T15:14:48+5:302024-03-18T15:15:16+5:30
भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव डावलण्यात आल्याने उदयनराजेप्रेमींमध्ये नाराजीचे सूर आहेत.
सातारा : पश्चिम महाराष्ट्रात तीन पक्षांमध्ये उमेदवारीवरून वाटाघाटी सुरू आहेत. चर्चेतून लवकर योग्य तो मार्ग निघेल. खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची उमेदवारी निश्चित होईल. पार्लमेंटरी बोर्ड वरिष्ठांशी चर्चा करत असून, लोकसभेची तिसरी यादी जाहीर होईल,’ असे सांगत साताऱ्याचा तिढा अद्यापही सुटला नसल्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव डावलण्यात आल्याने उदयनराजेप्रेमींमध्ये नाराजीचे सूर आहेत. उदयनराजे यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी ‘माझ्याकडे सर्वच तिकिटे आहेत’ असे सूचक वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खलबते सुरू झाली आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन सोमवारी सकाळी थेट साताऱ्यात दाखल झाले. ‘जलमंदिर’ या निवासस्थानी त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर कमराबंद चर्चा झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उदयनराजे भोसले मराठा समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांची उमेदवारी डावलून भाजप मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘भाजपने उमेदवारी जाहीर केली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत आकांडतांडव केले होते. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. उदयनराजे यांची उमेदवारी आम्ही नाकारलेली नाही. त्यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे वलय वेगळे असून, त्यांची पक्षालाच अधिक गरज आहे. सध्या महाराष्ट्रात मित्रपक्षाचे सरकार आहे. तिघांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे चर्चेतून योग्य तो मार्ग निघेल. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थानसारखी परिस्थिती महाराष्ट्रात असती तर अशी वेळच आली नसती. गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी देऊन साताऱ्याची जागा भाजपला सोडायची असा फाॅर्म्युला ठरला आहे का? याबाबत छेडले असता, असे काही ऐकिवात नसल्याचे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी अधिक बोलणे टाळले.
माढ्याच्या उमेदवारीवरून तणाव...
माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून काहीसा तणाव निर्माण झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री फडणवीस याबाबत त्यांच्याशी बोलणार असून, माढ्याचा प्रश्नही सुटेल, असेही महाजन म्हणाले.