सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला धो-धो, पूर्वेला थुई-थुई पाऊस!, शेतकरी चिंताग्रस्त
By दीपक शिंदे | Published: July 22, 2023 12:38 PM2023-07-22T12:38:53+5:302023-07-22T12:40:20+5:30
पूर्वेकडे फलटण तालुक्यात ऊन-सावल्यांचा खेळ
आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे तर पूर्वेकडे फलटण तालुक्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. फलटण तालुक्यात थुई-थुई पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, वाई तालुक्यांत धो-धो पाऊस पडत असल्यामुळे नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा, वाई, पाटण, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यांत संततधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत होऊन नद्यांना पूर आले आहेत.
तर जिह्याच्या पूर्व भागात कधी तरी थुई-थुई पाऊस पडत असल्याने फलटण तालुक्यात चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात आले आहे. तर ओढे, नाले, पाझर तलाव कोरडेठाक पडले आहेत. उन्हाळी हंगामातील पिके वाया गेली. खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरी पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे जिह्याच्या पश्चिमेला धो-धो तर पूर्वेला थुई-थुई पाऊस पडतो आहे.