‘तिथेच’ पुन्हा सापडली १४ जोडपी!तालुका
By admin | Published: September 7, 2015 08:55 PM2015-09-07T20:55:56+5:302015-09-07T20:55:56+5:30
पोलिसांची कारवाई : लुटीच्या घटना घडूनही धोका पत्करण्याची प्रेमिकांची हौस कायम
राजीव मुळ्ये - सातारा --मैत्रिणीसमवेत फिरायला गेलेल्या युवकाला चाकूचे वार करून लुटल्याची घटना ताजी असताना, त्याच परिसरात जाणाऱ्या प्रेमिकांचा ओघ काही आटलेला नाही. लुटीच्या घटनेनंतर पोलिसांनी वारंवार केलेल्या कारवाईत आतापर्यंत चौदा जोडपी त्याच ठिकाणी आढळली असून, त्यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले. ‘लोकमत’ने दि. १० जुलैच्या अंकात ‘माझिया प्रियाला धोका कळेना..’ या शीर्षकाखाली शहराच्या आसपासची धोकादायक ठिकाणे छायाचित्रांसह प्रसिद्ध केली होती. प्रेमिकांना फिरायला जाण्यास हक्काची ठिकाणे फारशी नाहीत, हे खरे असले तरी त्यासाठी धोका पत्करणे आणि नंतर पश्चात्तापाची वेळ येणे योग्य नसल्याने खबरदारी घेणेच योग्य ठरते. ‘लोकमत’च्या वृत्तांतात शाहूपुरी-कोंडवे रस्ता, यवतेश्वर रस्ता, महामार्गालगतचा वाढे रस्ता अशा अनेक धोकादायक ठिकाणांची आणि तेथे पूर्वी घडलेल्या घटनांची माहिती दिली होती. त्यातीलच एका ठिकाणी दि. २ सप्टेंबर रोजी लुटीची आणखी एक घटना घडली. या घटनेची नोंद पोलीसदफ्तरी झाली आहे.
या घटनेनंतर तालुका पोलिसांनी धोकादायक ठिकाणांची सायंकाळनंतर कसून पाहणी सुरू केली. जोडीने फिरायला जाणे हा गुन्हा नसला तरी सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन करणे कायदेशीर ठरत नाही. काही जोडप्यांनी सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनाची सीमारेषा ओलांडली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पकडण्यात आलेल्या जोडप्यांवर मुंबई पोलीस अॅक्टनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करणे पोलिसांना भाग पडले. फिरायला जाणाऱ्यांमध्ये जशी अविवाहित, विद्यार्थिदशेतील जोडपी असतात, तशीच विवाहित जोडपीही आढळून येतात. गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींचा अशा ठिकाणांवर नेहमीच डोळा असतो. धाक दाखवून रोकड, दागिने, मोबाइल लुटण्याच्या अनेक घटना घडतात. अनेकदा आपले गुपित उघड होण्याच्या भीतीने त्यांची नोंद पोलीसदफ्तरी केली जात नाही. जोडप्यातील मुलीच्या सुरक्षेलाही धोका पोहोचल्याची उदाहरणे घडतात. परंतु अजूनही एखाद्या लुटीच्या घटनेनंतर चारच दिवसांत त्याच ठिकाणी १४ जोडपी आढळतात, हेच आजचे वास्तव आहे.
महामार्गाला समांतर वाढे गावच्या हद्दीत असणारा रस्ता जितका खतरनाक बनला आहे, तशीच इतरही अनेक ठिकाणे आहेत. पश्चिमेकडील डोंगराळ भाग, कोंडवे रस्त्यावरील ओढ्याचा परिसर एकट्या जोडप्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे युवकांनी जबाबदारीने वागून धोका टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
समुपदेशनाचीही जबाबदारी...
आडबाजूला, सार्वजनिक ठिकाणी, धोक्याच्या ठिकाणी आढळून आलेल्या १४ जोडप्यांवर पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली असली, तरी पोलिसांना त्याहीपलीकडे जाऊन जबाबदारी पार पाडावी लागत आहे. आपले बिंग फुटल्याने विशेषत: मुलींची मन:स्थिती बिघडू शकते. एखादी मुलगी टोकाचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे अशा जोडप्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत आहे. आपण गैरवर्तन केल्याबद्दल अपराधीपणाची भावना या जोडप्यांच्या मनात येऊ नये आणि संभाव्य धोक्यांची जाणीवही व्हावी, असा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.