वाईच्या मैदानात आता दुरंगी लढत
By admin | Published: July 12, 2014 11:44 PM2014-07-12T23:44:07+5:302014-07-12T23:48:54+5:30
नगराध्यक्ष निवड : शिंदेंच्या माघारीनंतर खामकर-गायकवाड आमने सामने
वाई : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन अर्जांपैकी माघार घेण्याच्या मुदतीत नगरसेविका शोभा शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे तीर्थक्षेत्र आघाडीचे भूषण गायकवाड विरुध्द जनकल्याण आघाडीचे नंदकुमार खामकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करणार हे स्पष्ट झालेले आहे.
शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता नगरसेविका शोभा शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे दोन आघाड्यात सरळ लढत होणार असे स्पष्ट झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वाई नगरपालिकेची सत्ता हातात असणे महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. १९ नगरसेवक असणाऱ्या या पालिका हद्दीत सुमारे २५ हजार इतके मतदान आहे. विधानसभा मतदारसंघासाठी वाई शहर व परिसरातील सुमारे ३७ हजार मतदान आहे. त्यामुळे पालिका नगराध्यक्ष निवडीत दोन्ही आघाड्याकडून जोरदार प्रयत्न होणार हे निश्चित आहे.
पालिकेतील सत्ताधारी गटाला एकसंघ राखण्याचा प्रयत्न आमदार मकरंद पाटील यांनी केला आहे. ते स्वत: लक्ष घालत आहेत. दुसरीकडे जनकल्याण आघाडीचे आठ नगरसेवक असून त्यातील काही नगरसेवकांवर माजी आमदार मदन भोसले यांनी या निवडणुकीची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे. त्यातच तीर्थक्षेत्र आघाडीचे नगरसेवक राजकीय सहलीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)