कऱ्हाडात लाॅकडाऊन आहे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:05+5:302021-05-15T04:37:05+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे राज्यामध्ये लाॅकडाऊन जारी करण्यात आले आहे. मात्र कराड शहरात होणारी गर्दी, लोकांची बेफिकिरी, प्रशासनाचे ...
कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे राज्यामध्ये लाॅकडाऊन जारी करण्यात आले आहे. मात्र कराड शहरात होणारी गर्दी, लोकांची बेफिकिरी, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पाहिले की कराडात लाॅकडाऊन आहे का, असा प्रश्न सामान्यांना पडतो. पण या सा-यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचं काय करायचे, हा खरा प्रश्न आहे.
सातारा जिल्ह्यात दररोज समोर येणारी बाधितांची आकडेवारी सर्वांना धक्का देणारी आहे. जिल्ह्यात आकडा दररोज २००० पार करत आहे. त्यातील सुमारे २० टक्के बाधित फक्त कराड तालुक्यातील आहेत. आज कराडात बाधितांना बेड मिळेना. बेड मिळालाच तर तेथे ऑक्सिजनची टंचाई आहे. व्हेंटिलेटर बेड तर दुरापास्त आहे. त्यामुळे बाधित जीव मुठीत घेऊनच रुग्णालयात दाखल होत आहेत. तर कुटुंबीयांचे चेहरे चिंताक्रांत दिसत आहेत. हे सगळं खरं असलं तरी रस्त्यावरची गर्दी मात्र कमी व्हायला तयार नाही.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांनी घरपोच सेवा द्यायची आहे म्हणे. पण किती दुकानदार घरपोच सेवा देतात, हा देखील संशोधनाचा भाग आहे. लोकच दुकानाच्या बाहेर उभे दिसतात. अर्धे शटर उघडून व्यवहार सुरू आहेत. पण त्याही पुढे जाऊन ज्यांचे व्यवसाय अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत तीही दुकाने मागच्या दाराने सुरू दिसत आहेत. त्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे, याचाही शोध घेण्याची गरज आहे.
खरे तर या लाॅकडाऊनमध्ये धनवानांना काही मिळत नाही असे नाही. पण सर्वसामान्य माणसाचे मात्र नक्कीच हाल होत आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नका असे प्रशासन सांगते पण, कराडात गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. गर्दी कमी झाली तरच संकट कमी होईल हे यापूर्वीच पहिल्या लाटेत आपण अनुभवले आहे. मग मागच्या वेळेपेक्षाही लाट दुप्पट वेगाने वाढत असताना निर्बंध मात्र तितके कडक राबविलेले दिसत नाहीत. परिस्थिती विचित्र दिसते. पोलीस प्रशासनही तितक्या तातडीने कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना संकटावर आपण कोणाच्या भरोशावर मात करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
चौकट
परवानगीशिवाय उरकतंय लग्न
शासनाने विवाह सोहळ्यासाठी फक्त २५ माणसांची परवानगी दिली आहे. पण तीही काढण्याची तसदी अनेक जण घेत नाहीत. तालुक्यात अनेक ठिकाणी परवानगीविनाच लग्नविधी पार पडत आहेत. तेथे सामाजिक अंतर, लोकांची मर्यादा या सगळ्याला तिलांजली दिली जात आहे. याला कोणाला जबाबदार धरायचे हे समजत नाही.
चौकट
शटर बंद; व्यवहार सुरू...
अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने शासनाच्या नियमानुसार बंद आहेत. पण कराडात शटर बंद; पण व्यवहार सुरू अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मागच्या दाराने सगळ्या वस्तू मिळत आहेत. कोणी तक्रार केली तर पोलीसही तोंडदेखली कारवाई करीत आहेत. मग कोरोनावर कशी मात होणार, हा प्रश्न आहेच.
चौकट
म्हणे लसीकरणाला चाललोय...
अनेकदा पोलीस शहरातून फिरणा-याना अडवित आहेत. कुठे चाललाय, असा प्रश्न केला तर आम्ही लसीकरणाला चाललोय असे उत्तर मिळते. त्यामुळे पोलिसांनाही नाइलाजाने त्याला सोडावे लागत आहे. पण यातील लसीकरणासाठी किती जण जातात व उगाच किती जण फिरतात हे त्यांनाच माहीत.
फोटो
कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दररोज अशी गर्दी पाहायला मिळत आहे.
छाया -अरमान मुल्ला