विकासाच्या कैफात पर्यावरणाचा बळी नको
By admin | Published: August 29, 2014 09:21 PM2014-08-29T21:21:02+5:302014-08-29T23:12:58+5:30
पश्चिम घाट परिसर तज्ज्ञगटाचा अहवाल फेटाळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पर्यावरण क्षेत्रातून संमिश्र
सातारा : पश्चिम घाट परिसर तज्ज्ञगटाचा अहवाल फेटाळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पर्यावरण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विकास गरजेचा आहेच; मात्र त्यासाठी पर्यावरणाचे मोल देणे दीर्घकालीन विचार करता तोट्याचे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने पश्चिम घाट परिसर तज्ज्ञगटाची नियुक्ती केली होती. पर्यावरण संवर्धन स्थानिक जनसमूहांच्या हाती देणे, परिसरातील विकासाचे निर्णय ग्रामसभांनी घेणे आणि पर्यावरणविषयक कायद्यांचे काटेकोर पालन केले जाणे, या डॉ. गाडगीळ यांच्या प्रमुख शिफारशी होत्या. मात्र, हा अहवाल विकासविरोधी असल्याची तक्रार करून त्यास झालेल्या विरोधाची धार पाहून केंद्राने अहवालाचा फेरआढावा घेण्यासाठी अंतरिक्ष शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल स्वीकारून डॉ. गाडगीळ यांचा अहवाल फेटाळल्याची घोषणा केंद्राने गुरुवारी केली.पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ‘निसगर्संवर्धनाला कुणीच तयार नाही. विकासाच्या नावाखाली निसर्ग कुरतडला जात आहे. कधीतरी जाग येईल; पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल,’ अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. मात्र, कस्तुरीरंगन यांचा अहवालही शास्त्रीय असून, त्यामुळे विकास आणि पर्यावरण संवर्धन दोन्ही कामांना होत असलेला विलंब टळेल, असेही मत व्यक्त करण्यात आले. कास पठारावर कुंपणाला झालेला विरोध त्यावेळी दुर्लक्षित झाला; मात्र आता कुंपण चुकीचे असल्याचे ‘युनेस्को’च्याच प्रतिनिधीने सांगितले आहे, याची आठवण या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी करून दिली. ‘माधव गाडगीळ चूक आहेत, असे या क्षेत्रातील एकतरी माणूस दाखवा,’ असे आव्हान देतानाच ‘यापेक्षा कडक निर्बंध परदेशांत आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात,’ याकडेही अनेकांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
डॉ. गाडगीळ यांच्या अहवालातील मूळ तत्त्वे डॉ. कस्तुरीरंगन यांनी कायम ठेवली आहेत. उलट डॉ. कस्तुरीरंगन यांचा अहवाल अधिक शास्त्रीय आणि काटेकोर आहे. संवेदनशीलता ठरविण्यासाठी गाडगीळ यांनी ९ किमीचा झोन मानला आहे, तर कस्तुरीरंगन यांनी २४ मीटरचा झोन करून दूरसंवेदन तंत्राने अधिक काटेकोर मूल्यमापन केले आहे. संवर्धनाची तातडीची गरज त्यांनीही अधोरेखित केली असून, स्थानिकांच्या विचाराने पुढे जाण्यास सुचविले आहे. विकासाचे पुढील निर्णय शास्त्रीय आधारावरच घेतले जावेत.
- डॉ. राजेंद्र शेंडे, अध्यक्ष, तेरे पॉलिसी सेंटर
प्रत्येक क्षेत्रात संशोधन झाले पाहिजे, संशोधनावर खर्च झाला पाहिजे, असे सगळेच राज्यकर्ते म्हणतात. मोदीही नुकतेच तसे म्हणाले होते. पर्यावरण विषयात डॉ. गाडगीळ यांच्यापेक्षा मोठा संशोधक कोण असेल? संशोधकांचे काही ऐकायचेच नसेल, तर संशोधनाची भाषा आणि त्यावर खर्च तरी कशाला करता?
- डॉ. विश्वास देशपांडे, प्राणिशास्त्र विभाग, वाय. सी. कॉलेज, सातारा
डॉ. गाडगीळ यांच्या अहवालाविरुद्ध सामान्य लोक रस्त्यावर आले होते; मात्र त्यामागे अनेक ‘लॉबी’ होत्या. एकीकडे पश्चिम घाटाचा समावेश जागतिक वारसास्थळात व्हावा म्हणून सरकारनेच युनेस्कोकडे शिफारस करायची आणि दुसरीकडे त्याच्या संवर्धनाविषयीचा तज्ज्ञांचा अहवाल फेटाळायचा, हा दुटप्पीपणा झाला.
- नाना खामकर,
पर्यावरणवादी कार्यकर्ते
डॉ. गाडगीळ यांचा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला असला, तरी डॉ. कस्तुरीरंगन यांंचा अहवाल स्वीकारला आहे. नव्या सरकारची धोरणे विकासाला अधिक पोषक असल्याचे दिसून येते. तथापि, निसर्ग लयाला गेल्यास काय होईल, याचा विचार केला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण काही शिल्लक ठेवणार की नाही, याचे भान ठेवायला हवे.
- रोहन भाटे, मानद वन्यजीवरक्षक