निधी मिळत नसल्याने कोरोनाबाधितांवर मोफत अंत्यसंस्कार नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:03+5:302021-05-07T04:41:03+5:30
वडूज : कोरोनाबाधित मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करताना वडूज नगर पंचायतीला आर्थिकदृष्ट्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील सहा महिन्यांपासून ...
वडूज : कोरोनाबाधित मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करताना वडूज नगर पंचायतीला आर्थिकदृष्ट्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील सहा महिन्यांपासून ११० कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी वडूज नगर पंचायतीने साडेपाच लाख रुपये खर्च केले आहेत. शासन स्तरावरून अंत्यविधी खर्चासाठी कोणताही निधी उपलब्ध झाला नसल्याने वडूज नगर पंचायत प्रत्येक कोविड मृतावर अंत्यसंस्कारासाठी पाच हजारांची पावती देत आहे. शासन स्तरावरुन या खर्चासाठी कोणताही निधी उपलब्ध न झाल्याने वडूज नगर पंचायतीला हा निर्णय घेणे भाग पडले आहे.
कोरोना काळात मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वडूज शहरातील एका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. २१ एप्रिलपर्यंत ११० कोविड मृतांवर वडूज नगर पंचायतीने मोफत अंत्यसंस्कार केले. खटाव-माण तालुक्यांतील कोविड मृतांवर वडूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. तसेच घटनास्थळावरून मृतांना आणण्यासाठी वडूज नगर पंचायतीची शववाहिका वापरात येत आहे. त्यामुळे वडूज नगर पंचायतीवर आर्थिक तर नगर पंचायत प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. दररोज या कर्मचाऱ्यांना सुमारे सात ते आठ अंत्यविधी करावे लागत आहेत. आरोग्याची चिंता न करता कोविड मृतांवर हे कर्मचारी अंत्यसंस्कार करत आहेत. वास्तविक पाहता यापूर्वी संबंधित प्रशासनाकडून सात पीपीई किट, १० लीटर डिझेल, ११ मण जळण असा प्रशासकीय एक खर्च आहे. मात्र, तो खर्च संबंधित प्रशासनाकडून उपलब्ध न झाल्याने वडूज नगर पंचायतीने मोफत अंत्यस्कार करण्यास मनाई केली. अशा अंत्यविधीसाठी नाममात्र कर आकारणी पाच हजार रुपये २१ एप्रिलपासून सुरू केली आहे. संबंधित कर आकारणीची पावतीदेखील नातेवाईकांना दिली जात आहे.
गत सहा महिन्यांपासून ११० जणांवर वडूज नगर पंचायतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अंत्यसंस्कार केले. मात्र, आर्थिक तारेवरची कसरत करत अहोरात्र आरोग्याची पर्वा न करता, धडपडणाऱ्या या कोविड योद्धयांना वडूज नगर पंचायत प्रोत्सानपर नाममात्र अनुदान देत आहे.
---------------------------------------
कोट..
या काळात नगर पंचायत प्रशासनामध्ये आर्थिक कोंडी निर्माण झाली असून, कठीण काळात सुविधा देऊनही आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे ही नाममात्र कर आकारणी करणे भाग पडले आहे. तालुक्यातील मुख्यालय असलेल्या वडूज शहरात अत्याधुनिक रुग्णवाहिका असावी, या उदात्त हेतूने रुग्णवाहिका खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, नगर पंचायत, वडूज
फोटो ..
०६वडूज
वडूज स्मशानभूमीत खटाव-माण तालुक्यांतील कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. (छाया : शेखर जाधव )
----------------------------------------