साताऱ्यात यंदा चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती नाही

By admin | Published: May 22, 2015 11:09 PM2015-05-22T23:09:25+5:302015-05-23T00:33:54+5:30

पालिकेचे यशस्वी पाऊल : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांचा पुढाकार; ‘लोकमत’च्या चळवळीला व्यापक स्वरुप

There is no idol of more than four feet in Satara this year | साताऱ्यात यंदा चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती नाही

साताऱ्यात यंदा चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती नाही

Next

सातारा : सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त नको, असे मूर्तिकारांना सांगण्यात आले होते; परंतु त्यावेळेस उशीर झाला होता. यावर्षी सातारा पालिकेने पुढाकार घेऊन मूर्तिकार आणि व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात साताऱ्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी दोन्ही बाजंूने प्रयत्न करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत एकमत झाले. गेल्यावर्षीपासून ‘लोकमत’ने राबविलेल्या चळवळीला यामुळे व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे.
साताऱ्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सातत्याने प्रयत्न करत होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेने विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, खासगी तळ्यात विसर्जन नको, अशा कडक सूचना केल्या होत्या. मागील वर्षी पर्याय नसल्याने ऐनवेळेस खासदारांनी मंगळवार तळ्यात विसर्जनास परवानगी दिली होती; परंतु २०१५ च्या गणेशोत्सवासाठी पालिकेने पाण्याचे स्त्रोत दूषित होणार नाहीत, यासाठी आतापासून तयारी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. सातारा पालिकेत जनता दरबारात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय करता येईल, यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. सातारा पालिकेने शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा, यासाठी हालचाली सुरू केल्या. २०१३ च्या सर्वसाधारण सभेत त्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा ठरावही करण्यात आला. त्यानुसार मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त नको. मूर्तींचे विसर्जन मंगळवार तळे, मोती तळ्यात न करता कृत्रिम तलावात करावे, वाहतुकीला अडथळा होईल, असे मंडप नकोत, डॉल्बीचा वापर नको यासारख्या बाबींचा समावेश होता.
शुक्रवारी पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात मूर्तिकार आणि मूर्ती व्यावसायिक आणि पालिका पदाधिकारी, अधिकारी यांची प्राथमिक बैठक झाली. बैठकीला नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे, मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी आशिष लोकरे, डॉ. शैला दाभोलकर, अ‍ॅड. डी. जी. बनकर, अविनाश कदम, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, नरेंद्र पाटील, सुशांत मोरे आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे म्हणाल्या, ‘२०१५ चा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी बैठक घेण्यासाठी उशीर झाला होता, म्हणून यावर्षी लवकर बैठक घेण्यात आली आहे. मूर्तिकारांनी चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती करू नयेत. मूर्ती रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरावेत. तसेच याबाबत काही सूचना असतील तर त्या सांगाव्यात, असे आवाहन केले.
यावेळी मूर्ती व्यावसायिक संजय पोतदार यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूिर्तकरांचा पाठिंबा आहे; परंतु यावर्षी मूर्ती विसर्जन कोठे करणार, ते अगोदर पालिकेने जाहीर करावे. तसेच बाहेरून येणाऱ्या मूर्तिकारांच्याबाबतीत काय भूमिका राहणार हेही जाहीर करावे. सातारा पालिकेने मूर्ती शाडू्च्या आहेत की प्लास्टर आॅफ पॅरिसच्या याचा सर्व्हे करावा. मूर्तींना नैसर्गिक रंग देण्यास आमची तयारी आहे. ’
डॉ. शैला दाभोलकर म्हणाल्या, ‘आपल्याला याबाबतच्या प्रबोधनाची मोहीम वाढवावी लागेल. शाळेतील मुलांचे प्रबोधन करावे म्हणजे घरोघरी शाडू्च्या मूर्ती बसतील. यामुळे काहीचा तोटा होणार आहे ; परंतु त्यांचा तोटा भरून निघण्यासाठी काय करता येईल, याबाबतही विचार व्हावा म्हणजे ते आपोआप निर्णयाची अंमलबजावणी करतील. मागील वर्षी ज्या १२८ मंडळांनी मोठ्या मूर्ती बसवल्या होत्या त्यांच्याकडून यावर्षी फॉर्म भरून घ्या. निर्णयाच्या अंमबजावणीसाठी सर्वांची साथ असणे महत्त्वाचे आहे.


राजस्थानी कलाकारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ. उत्सव चांगल्या पद्धतीने होऊन त्याचा आनंद घेता यावा.
- अविनाश कदम,
नविआचे पक्षप्रतोद
गेली बरेच वर्षी याबाबत चर्चा सुरू आहे. डॉल्बीला परवानगी द्यायची नाही, असे ठरल्यानंतर पोलीस खाते ऐनवेळेस परवानगी कसे देते, हे एक कोडेच आहे.
- अ‍ॅड. बाळासाहेब बाबर,
विरोधी पक्षनेते


नगरपालिकेने २०१३ मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा ठराव केलेला आहे. कायदा कठोरपणे राबवण्यापेक्षा सगळ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
ज्याप्रमाणे फटाक्याच्या स्टॉलसाठी स्वतंत्रव्यवस्था केली जाते त्याचप्रमाणे गणपती विक्री करणाऱ्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करू.
- अ‍ॅड. डी. जी. बनकर,
साविआचे पक्षप्रतोद

Web Title: There is no idol of more than four feet in Satara this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.