Lok Sabha Election 2019 खासदारांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा: नरेंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:54 PM2019-04-19T23:54:01+5:302019-04-19T23:54:22+5:30
सातारा : ‘साताऱ्याच्या खासदारांना २३ प्रश्न विचारले होते, एकाचेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. १० वर्षे खासदार राहिलेल्यांना चिठ्ठी लिहून ...
सातारा : ‘साताऱ्याच्या खासदारांना २३ प्रश्न विचारले होते, एकाचेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. १० वर्षे खासदार राहिलेल्यांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा, असे वाटते. यावरून ते किती कार्यक्षम आहेत, हेही दिसत असून, लोकांशी निगडित प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत,’ असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे उमेदवर नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंवर नाव न घेता पुन्हा एकदा केला.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे उमेदवार पाटील म्हणाले, ‘छत्रपती म्हणून साताºयाच्या खासदारांना विरोध नाही; पण ते योग्य लोकप्रतिनिधी नाहीत. तर खासदारांच्या जवळचीच माणसे उमेदवाराला पळवून नेतात. हे काय योग्य नाही. आज खासदारांकडूनच अपमानित झालेले लोकही त्यांच्याच जवळ आहेत. त्या लोकांनाही हे कसे पटते समजत नाही. सातारा नगरपरिषदेत तर सर्व गोंधळाचाच कारभार सुरू आहे. खासदारांनी निवडणुकीसाठी कार्यालय घेतलंय. त्याचा कर भरला नसल्याचं समोर आलं आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा. पालिकेतील अंधाधुंद कारभाराचा मुख्यमंत्र्यांच्या सभेत चांगलाच समाचार घेतला जाणार आहे.’ खासदारांच्या माणसांच्या माध्यमातून पोलिसांवरही दबाव आणला जात आहे, असा आरोप करून पाटील पुढे म्हणाले, ‘राज ठाकरेंनी साताºयात सभा घेतली. त्यावेळी त्यांच्या भाषणात मोदी द्वेषच होता. येथील उमेदवाराबद्दल ते काहीच बोलले नाहीत. ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी इथल्या उमेदवाराबद्दल बोलले असते तर चांगले झाले असते.’
माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांनीही मला दिला. या निवडणुकीत कोण-कोण पाठीशी आहे, हे सांगणे आता बरोबर नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
मिशीपेक्षा दाढी चांगली...
पत्रकार परिषदेत आमचं ठरलंय अन् मिशी व कॉलरबद्दल नरेंद्र पाटील यांना बोलतं केलं. त्यावेळी पाटील यांनी कॉलर का मिशी चांगली तुम्हीच ठरवा. मर्दाची शान ही मिशी असते. दाढी ठेवणं हे तर अधिकच चांगलं असतं, असंही सांगितले. यावर उपस्थित राजकीय पदाधिकाºयांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याच नावाने चर्चा सुरू झाली अन् हा एक डिवचण्याचाच प्रकार होता, असंही समोर आलं.