आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा!
By admin | Published: October 25, 2015 12:41 AM2015-10-25T00:41:05+5:302015-10-25T00:41:05+5:30
मार्डी येथील स्थिती : निवासी डॉक्टर नसल्याने रुग्णांना अनेक अडचणी
पळशी : माण तालुक्यातील मार्डी हे गाव नेहमीच गजबलेलं ठिकाण. परिसरातील लोक या ना त्या कारखाने व आठवडी बाजारासाठी तसेच इतर कामांसाठी येथे येतात. या बरोबरच हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी रुग्णांची रीघ लागलेली दिसून येते. मात्र, हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहे. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तर येथे येणारे वैद्यकीय अधिकारी हे तात्पुरत्या कालावधीसाठी येत असून, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास वाली कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त केली जात आहे.
गेल्या चार महिन्यांपासून केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. या काळात तात्पुरत्या नेमणुका होत असून, बऱ्याचवेळा वैद्यकीय अधिकारी उपलब्धच नसतात. त्यामुळे आज डॉक्टर भेटतील का? या विवंचनेतच रुग्णांना यावे लागत आहे. आतापर्यंत फलटणचे डॉ. मदने हे काम पाहत असून, त्यांचीही नियुक्ती तात्पुरतीच असल्याचे समजते. त्यामुळे या केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळणार का? अशी विचारणा होत आहे.
मार्डीतील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मार्डी, भालवडी, इंजबाव, खुंटबाव, मोही, राणंद, रांजणी, झाशी या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. गाव परिसरातील तसेच वाड्या-वस्त्यांवरील दररोज सरासरी ९० ते १०० बाह्यरुग्ण उपचार घेतात, तर आंतररुग्ण विभागात अनेक रुग्ण उपचार घेतात. बऱ्याचदा डॉक्टर नसल्याने गरोदर मातांचे खूप हाल होतात. डॉक्टरांअभावी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
नुकतेच हे केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी असावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)
डॉक्टर आहेत का हो?
आरोग्य केंद्रात आल्यानंतर डॉक्टर आहे का हो? अशी केवीलवाणी चौकशी रुग्ण करताना आढळतात. परिसरातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, रात्री-अपरात्री त्यांना शेतात जावे लागते. त्यावेळी काही दुखापत किंवा सर्पदंश यासारखे प्रकार घडल्यास रात्रीच्या वेळी जायचे कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.