सरपंच झालं की मृत्यू... छे हो, असं काहीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:41+5:302021-02-24T04:40:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गावात चेष्टेतून बोललेल्या विषयाचा धागा पकडून प्रसारमाध्यमांद्वारे महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गावात चेष्टेतून बोललेल्या विषयाचा धागा पकडून प्रसारमाध्यमांद्वारे महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गाव जगप्रसिद्ध झाले. गावचे सरपंचपद स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणून चार पंचवार्षिक गावचे सरपंचपद रिक्त राहिलं, अशा अफवा पुढं आल्या. पात्र उमेदवार नसल्याने हे पद रिक्त राहिले, ही वस्तुस्थिती ग्रामस्थांनी सांगितली. गावात अंधश्रद्धेचा बाजार कोणीच मांडत नाही, माध्यमांनीही आता हे बास करावं, अशी आर्जव ‘लोकमत’कडे ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सरपंच झालं की मृत्यू होतो, ही अफवा कोणीतरी माध्यमांपर्यंत पोहोचवली अन् कॅमेरामनची पावले महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावाकडे वळली. ‘लोकमत’ टीमने या अंधश्रद्धेमागे खरं कारण काय याचा शोध घेतला आणि हाती आली अफवेमागील रिॲलिटी! महाबळेश्वर तालुक्यात राजपुरी हे सुमारे बाराशे ते तेराशे लोकसंख्येचं पाचगणीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर, डोंगरउतारावर वसलेलं हे नेटकं गाव. स्टॉबेरीच्या उत्पादनामुळे गाव तसं बऱ्यापैकी सुधारलेले असलं तरीही गावाचा बाज अद्यापही कायम. या गावचे सरपंचपद स्वीकारणाऱ्याचा मृत्यू होतो, ही कांडी गावात पिकली. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला हवा मिळाली आणि कानोकानी ती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली. तोपर्यंत सरपंचपदाची निवड झाली आणि गावची सून शीतल विश्वास राजपुरे या सरपंचपदी विराजमान झाल्या.
राजपुरी गावाला भेट देऊन ‘लोकमत’ने ग्रामस्थांसह नूतन सरपंच शीतल राजपुरे यांच्याशीही संवाद साधला. त्यावेळी या अंधश्रद्धेमागील गोष्टीचा उलगडा झाला. सरपंच म्हणून काम केलेल्या व्यक्तींचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. यातील एकाचा सरपंचपदावर असताना मृत्यू झाला आहे. गेले तब्बल ४ टर्म सरपंचपद रिक्त होते. या काळात गावचे तत्कालीन उपसरपंचच गावाचा कारभार पहात. यावेळी निवडणुकीनंतर महिला आरक्षणामुळे शीतल राजपुरे यांना संधी मिळाली आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली.
योगायोगामुळे काही गोष्टी घडल्या. त्यामुळे कोणी गैरसमजातून अफवा पसरवली असावी. तथापि, असं काहीही नसल्याचे ग्रामस्थ गंगाधर राजपुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, तर पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि सलग सरपंचपद रिक्त राहणे या दोन गोष्टींचा कोणी रिकामटेकड्याने विनाकारण संबंध जोडून वावड्या उठवल्या. त्यामुळे ही अफवा माध्यमांपर्यंत पोहोचली. प्रत्यक्षात गावात असं काही मानलं जात नाही, असे बाळू भिकू राजपुरे व इतर काही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
चौकट . . .
कृपया गावची बदनामी नको!
गावात चेष्टेतून सुरू झालेला हा विषय माध्यमांपर्यंत पोहोचला. गावात श्रद्धा जोपासणारे ग्रामस्थ आहेत, पण मृत्यू होईल म्हणून सरपंचपद रिक्त ठेवण्याची मानसिकता ग्रामस्थांची नाही. माध्यम प्रतिनिधींना ग्रामस्थांनी याबाबत सविस्तराने माहिती दिली, पण तरीही माध्यमांतून याचा विपर्यास झाला. याबाबत गावाबाहेर राहणाऱ्या अनेकांनी गाव कारभाऱ्यांना सुनावलेही. निव्वळ तांत्रिक बाबींमुळे सरपंचपद रिक्त राहिले, त्याचा कोणत्याही अंधश्रद्धेशी संबंध नाही, असं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट :
मी आस्तिक आहे, पण सरपंचपद स्वीकारल्यानंतर काही वाईट घडते, हे मला मान्य नाही. माझ्या कुटुंबातही कोणी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे सरपंचपदाची संधी मिळाली त्यावेळी व आजही मी मोकळेपणाने काम करत आहे. अफवा किंवा अंधश्रद्धेचा गावावर मागमूसही नाही.
- शीतल विश्वास राजपुरे,
सरपंच राजपुरी, महाबळेश्वर
चौकट :
पद रिक्त राहण्याची हकीकत!
ग्रामपंचायतीच्या ४ पंचवार्षिक निवडणुकांत सरपंच पदासाठी आरक्षण पडले. या चारही वेळा त्या आरक्षणासाठी पात्र उमेदवार सदस्यांमध्ये नव्हता. त्यामुळेच सरपंचपद रिक्त राहिल्याचे राजपुरीचे माजी उपसरपंच व विद्यमान पोलीसपाटील अजय शंकर राजपुरे यांनी सांगितले. ‘ज्यांचा मृत्यू झाला तो वार्धक्य अथवा आजारपणामुळे झाला आहे. मृत्यूच्या दुर्दैवी घटनेचा आणि सरपंचपदाचा अर्थाअर्थी संबंध नाही. या केवळ वावड्या उठवल्या गेल्या,’ असेही राजपुरे यांनी स्पष्ट केले.