Satara Politics: सुडाचे राजकारण होऊ नये; अन्याय झाला तर आवाज उठवणार - शशिकांत शिंदे
By नितीन काळेल | Updated: December 25, 2024 19:22 IST2024-12-25T19:21:02+5:302024-12-25T19:22:26+5:30
अभयसिंहराजे लोकप्रिय; शरद पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही..

Satara Politics: सुडाचे राजकारण होऊ नये; अन्याय झाला तर आवाज उठवणार - शशिकांत शिंदे
सातारा : विराेधक हा निवडणुकीत असतो. आता सुडाचे राजकारण होऊ नये. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नवीन मंत्रीही सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. तरीही अन्याय झाला तर आंदोलनाने आवाज उठवू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. तसेच शरद पवार यांनी अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला नाही. त्यावेळी त्या-त्या परिस्थितीनुसार निर्णय झाले होते, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अर्चना देशमुख आदी उपस्थित होते.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत विचारात घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यातून सर्वांनाच सतर्क करायचे होते. राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन झाले असून सातारा जिल्ह्यातील चारजण कॅबिनेट मंत्री झालेत. दोन उपमुख्यमंत्रीही सातारा जिल्ह्यातील असल्यासारखेच आहेत. या सर्वांकडून जिल्ह्यातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील. जिल्ह्याचा विकासाचा बॅकलाॅग भरून निघेल, अशी आशा आहे.
निवडणुकीनंतर राज्यात सरकार आले असलेतरी लोकांत अजून विश्वास दिसत नाही. कारण, बीड आणि परभणीसारख्या घटना घडल्या आहेत. राज्यात अशांततेचे वातावरण होऊ नये, अशी अपेक्षा आहे. त्यातच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते. तो लाभ पूर्वी ज्या महिलांना मिळाला तेवढ्यांनाच द्यायला हवा. दूध दराचा प्रश्न आहे. तसेच कांदा दर, ऊसदर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज मिळावी. शेतीपंपांना सोलर वीजची सक्ती करण्यात येऊ नये, अशीही आमची भूमिका आहे. यासाठी २७ डिसेंबरला साताऱ्यात दुचाकी रॅली काढून वीज कंपनी, वन विभागात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. तसेच हे प्रश्न न सुटल्यास जानेवारी महिन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. यातून पक्ष मजबूत करण्यात येणार येईल. तसेच पुढील काळात कार्यकर्त्यांवरही अन्याय होऊ देणार नाही.
अभयसिंहराजे लोकप्रिय; पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही..
आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यामुळे अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर आमदार शिंदे यांनी त्यावेळी पवार हे निर्णय घेत नव्हते. जिल्ह्यातील नेते निर्णय घेत होते. मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे.
तसेच अभयसिंहराजेंमुळेच मला संधी मिळाली. मी त्यांच्याबरोबर असायचो. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे एवढे त्यांच्याकडे गुण होते. विलासराव देशमुख यांनी अभयसिंहराजे भोसले यांना राष्ट्रवादीतून फोडण्याचा प्रयत्न केला होता. कारण, अभयसिंहराजे हे लोकप्रिय नेते होते. त्यामुळे पवार यांनी अन्याय केला नाही. तर त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय झाले. त्यामध्ये पवार यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, असे उत्तर दिले.