पवारवाडीत तुफान आलंया...काळ्या भुईचं सपानं आलंया!
By admin | Published: May 22, 2017 05:03 PM2017-05-22T17:03:46+5:302017-05-22T17:03:46+5:30
शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग : सावित्रीच्या लेकींकडून पवारवाडीत श्रमदान
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. २२ : सातारा जिल्ह्यातील पवार वाडीत शनिवार दि. २0 आणि रविवार दिनांक २१ मे रोजी राष्ट्र सेवा दलातल्या "सावित्रीच्या लेकी "समवेत राज्यभरातून आलेल्या शेकडो राष्ट्र सेवा दल सैनिकांनी श्रमदान केले. श्रमदान करणाऱ्या मध्ये तरुणींची संख्या लक्षणीय होती.
मुंबई, पालघर, पनवेल, सिंधुदुर्ग, नासिक, मालेगाव, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर अशा राज्यभरातील सेवादल शाखांमधून कार्यकर्ते श्रमदानासाठी पवार वाडीत दाखल झाले होते. झाडे लावण्यासाठी शेकडो खड्डे त्यांनी खोदले. येत्या पावसाळ्यात तिथं झाडे लावली जाणार आहेत. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी सीड बँकेच्या माध्यमातून शाळा-शाळा मधून जमा केलेल्या हजारो बिया गावच्या सरपंचांकडे दिल्या.
राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी गावकरी मोकळा संवाद करताना दिसत होते.या पुढे स्मार्ट व्हिलेज करण्याचा संकल्प या गावचे तरुण सरपंच राजेंद्र पवार यांनी बोलून दाखविला.जल संधारणाबरोबर या गावातील लोकांचे मनसंधारण या निमित्ताने झाले ही या "सत्यमेव जयते वॉटर कप" स्पर्धेची आणि "राष्ट्र सेवा दला" सारख्या संघटनेचे यश आहे.
या शिबिरात श्रमदानाबरोबरच लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे, शाहीर कैलास जाधव, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ अभिजीत वैद्य, तरुण कीर्तनकार सचिन पवार, पवार वाडीचे सरपंच राजेंद्र पवार, वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन माने, पत्रकार अश्विनी सातव, राजा भाऊ अवसक, प्रा. रामदास निकम यांनी दोन दिवस मार्गदर्शन केले.
देशा मध्ये धर्माच्या,जातीच्या नावावर जे राजकारण सुरु आहे त्याच्या विरोधात श्रम दाना बरोबरच वैचारिक श्रमदान करण्याची गरज राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केली.
राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, संजय रेंदाळकर, सचिव नचिकेत कोळपकर , विद्याधर ठाकूर, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत डिग्रजे, छात्र भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता ढगे, सुनील स्वामी, दामिनी पवार, उषा कोष्टी, वैशाली हुबळे, शोभा स्वामी, श्वेता दिब्रिटो आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
पाणी फौंडेशनच्या या स्पर्धेच्या माध्यमातून बांधावरून गावात सुरु असलेले वाद १00 टक्के मिटले आहेत. जलसंधारणाबरोबर मनसंधारणेचे काम या निमित्ताने झाले.माणसे जोडण्याचे सेवा दलाचे हे काम आम्ही पुढे नेऊ.
- राजेंद्र पवार, सरपंच,
पवारवाडी, ता.कोरेगाव