राष्ट्रवादी आमदारांच्या गणतीत येळगावकर नव्हतेच!

By Admin | Published: July 7, 2014 11:02 PM2014-07-07T23:02:32+5:302014-07-07T23:03:39+5:30

जिल्हाध्यक्ष : आमदारांच्या कार्यपध्दतीवर होते आतून नाराज

There was no Yelgaonkar in the counting of NCP MLAs! | राष्ट्रवादी आमदारांच्या गणतीत येळगावकर नव्हतेच!

राष्ट्रवादी आमदारांच्या गणतीत येळगावकर नव्हतेच!

googlenewsNext

सातारा : भाजपच्या पठडीत तयार झालेल्या डॉ. दिलीपराव येळगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस कधी मानवलीच नाही आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना कधी गणतीत धरलेच नाहीे. मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. परिणामी वारंवार नाराज झालेल्या येळगावकरांना अखेर राष्ट्रवादीला रामराम करत पुन्हा स्वगृही परतावे लागले आहे. दरम्यान, येळगावकरांच्या जाण्यामुळे माण, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर या तीन मतदार संघांतील काही गावांत राष्ट्रवादी बॅकफूटवर जाऊ शकते. येळगावकरांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे दुष्काळी पाणीप्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष हे कारण दिले असले तरी अन्य कारणे देखील दुर्लक्षून चालणार नाहीत. आक्रमक चेहरा म्हणूून ओळख असलेल्या येळगावकरांना खटावच्या जनतेने एकदा आमदार म्हणून स्वीकारले. त्यांचा आमदारकीचा कालावधी त्यांच्या विविध प्रकारच्या आंदोलनामुळे गाजला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांना माणमध्ये पराभूत व्हावे लागले. या राजकीय कालखंडात त्यांच्यासमोर असंख्य अडचणी निर्माण झाल्या. अडचणीच्या काळात मदत म्हणून त्यांना राष्ट्रवादी हाच एकमेव मार्ग सापडला. मात्र, तत्पूर्वीही त्यांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ‘घड्याळ’ हातात बांधले होते. ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ‘विदूषक’ म्हणून हेटाळणी केली त्याच राष्ट्रवादीत कालांतराने येळगावकरही डेरेदाखल झाले. दरम्यानच्या काळात त्यांची आक्रमकता पाहून आणि शशिकांत शिंदे मंत्रिपदी विराजमान झाले आणि जिल्हाध्यक्षपदाची माळ येळगावकरांच्या गळ्यात पडली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांकडून काही प्राथमिक अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यांच्या अपेक्षा पक्षवाढीच्या असल्यातरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला येळगावकर आणि शिस्तबद्धपणा मान्य नव्हता. येळगावकरांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात शिस्तीला दिलेले प्राधान्य बेशिस्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी मानवलेच नाही. संबंधित आमदारांनी अथवा विविध सेलचे अध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भागात एखादा मेळावा लावला तर त्याची कल्पना जिल्हाध्यक्ष म्हणून द्यायला हवी, निमंत्रित करायला हवे, अशी अपेक्षा येळगावकरांची होती. मात्र, मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब येळगावकरांच्या नेहमीच जिव्हारी लागली होती. तशी खंत त्यांनी मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्याकडेही व्यक्त केली होती. परिणामी येळगावकर ज्या-ज्यावेळी नाराज व्हायचे, त्या-त्यावेळी हे दोघेही त्यांची समजूत काढत होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यांनी राष्ट्रवादीने दिलेली गाडी कार्यालयाच्या ताब्यात दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तरी ते गाडी कार्यालयातून नेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी गाडी नेली नाही. गोपीनाथ मुंडे ग्रामीणविकास मंत्री झाल्यानंतर त्यांना भाजपमध्ये येण्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र, मुंडे यांच्या निधनामुळे त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला.

Web Title: There was no Yelgaonkar in the counting of NCP MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.