उन्हाचा फटका, आकाशात उडणारे पक्षी जमिनीवर लागले कोसळू
By प्रगती पाटील | Published: April 24, 2024 06:10 PM2024-04-24T18:10:46+5:302024-04-24T18:11:12+5:30
उन्हाची तीव्रता वाढली : पाणवठेही कोरड ठाक
सातारा : उष्माघाताचा फटका माणसांबरोबरच पक्ष्यांनाही बसु लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातारा शहर व परिसरात उष्माघाताने पक्षी जमिनीवर कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. उन्हाची तिव्रता आणि निर्जलिकरणामुळे हे पक्षी कोसळत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. धक्कादायक बाब म्हणजे पशुपक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे यासाठी तयार करण्यात आलेले पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत. यात तातडीने पाणी भरण्यात यावे अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठल्यामुळे सगळ्यांचीच लाहीलाही होत आहे. वृक्षतोड झाल्यामुळे डोंगर बोडके झाले आहेत तर सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे पक्ष्यांचा निवारा हिरावला गेला आहे. त्यातच वाढत्या उकाड्याने निसर्गातील पाणीस्त्रोत आटून गेले आहेत. निसर्गातील पाण्याचे झरे आटल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. मानवी वस्तीत वास्तव्यास असणारे पक्षीही अन्न व पाण्याच्या शोधात बाहेर पडत असताना आकाशातून कोसळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा बळी
उन्हाळ्याच्या महिन्यात उष्माघात आणि डिहायड्रेशनमुळे पक्ष्यांना त्रास हाेतोच. अलिकडच्या वर्षांत उष्म्याचा पारा वाढल्याने शहरातील तापमानात वाढ होत आहे. पक्ष्यांची वाढती संख्या डिहायड्रेशन आणि उष्माघाताला बळी पडते. वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेत उडताना पक्ष्यांना झटके आणि चक्कर येण्याची शक्यता असते, ज्यामुळे अनेकदा प्राणघातक पडझड होते. बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि ताप सहन करावा लागतो. शरीराचे तापमान ४५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते. यामुळे मेंदूच्या पेशी आणि महत्वाच्या अवयवांना मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ज्यामुळे फेफरे, कोमा आणि पक्ष्याचा अंतिम मृत्यू होतो. पक्षांना वेळेवर उपचार केल्यास तीन ते चार दिवसांत बरे होण्यास मदत होऊ शकते.
शहरांमध्ये व्हावी पक्ष्यांच्या पाण्याची सोय
रस्त्याच्या कोपऱ्यांवर पक्षी पाण्याचे फीडर बसवण्यासाठी सरकारी नियमांच्या गरजेवर प्राणी हक्क कार्यकर्ते भर देतात. हे फीडर विशेषतः गरम हवामानात पाण्याचा सहज उपलब्ध स्रोत प्रदान करतात. स्वच्छ पाण्याचा नियमित प्रवेश निर्जलीकरण टाळतो, स्ट्रोक आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका कमी करतो. ही साधी तरतूद पक्ष्यांच्या लोकसंख्येला आधार देते, त्यांच्या कल्याणासाठी आणि आव्हानात्मक वातावरणात टिकून राहण्यास मदत करते.
- शहरीकरण आणि उंच इमारतींच्या वाढीमुळे, पक्ष्यांना पाणी मिळविण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो.
- इमारतींवरील काचेच्या पृष्ठभागावर परावर्तित होणारा सूर्यप्रकाश त्यांना विचलित करू शकतो.
- उन्हाळ्यात रस्त्यावरील प्राणी आणि पक्ष्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
- फॅन्सी वॉटर फीडर खरेदी करण्याची गरज नाही.
- पिण्याच्या पाण्याची बाटली किंवा भांडे वापरू शकता.
- बाल्कनी किंवा सोसायटी गेटच्या बाहेर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी ठेवा
उन्हाळ्याची तिव्रता लक्षता घेता वन विभागाने तातडीने पाणवठ्यांमध्ये पाणी भरणे अपेक्षित आहे. बोलु शकणाऱ्या माणसाची घरात राहून लाहीलाही होतेय तिथे या मुक्या प्राण्यांची काय गत? कोट्यावधी रूपये खर्च करून वनक्षेत्रात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले. या पाणवठ्यांमध्ये एेन उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पाणीच मिळत नसेल तर त्यावर केलेला खर्च वायाच गेला असं म्हणावं लागेल. - सुधीर सुकाळे, ड्रोंगो पर्यावरणीय संस्था