घरात बसून लहान मुले झाली टुमटुमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:00+5:302021-07-04T04:26:00+5:30

सातारा : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांची शारीरिक हालचाल बंद झाली आहे. घरात बसून राहिल्याने ...

There were little children sitting in the house | घरात बसून लहान मुले झाली टुमटुमीत

घरात बसून लहान मुले झाली टुमटुमीत

Next

सातारा : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मुलांच्या शाळा बंद असल्याने त्यांची शारीरिक हालचाल बंद झाली आहे. घरात बसून राहिल्याने त्यांच्या नैसर्गिक शारीरिक हालचालींवर मर्यादा आली आहे. त्यामुळे घरात बसून लहान मुलं टुमटुमीत झाली आहेत. त्यांची ही तब्येत भविष्यात आरोग्याचे प्रश्न निर्माण करू शकेल, अशी शक्यता वैद्यकीयतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनातर्फे निर्बंध लावण्यात आले. लॉकडाऊनला आता दीड वर्षांचा काळ लोटला आहे. या कालावधीत मुलांना कुठल्याच कारणांनी घराबाहेर काढायला पालक धजावले नाहीत. दुसरी लाट संपता संपताच लहान मुलांना घातक ठरू शकणारी तिसरी लाट केव्हाही येईल, या भीतीने तर पालकांनी मुलांना घरात अक्षरश: कैद करून ठेवले आहे. मुलांच्या शारीरिक हालचाली कमी आणि खाणं वाढल्याने स्थुलता वाढली आहे. भविष्यातील याचा दुष्परिणाम जाणवू नये म्हणून पालकांनी आत्ताच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

चौकट

ही काळजी घ्याच

लहान मुलांना व्यायामाची गरज नाही, असं अनेक पालकांना वाटतं. व्यायाम हा शरिराच्या सर्वांगीण वाढीसाठी उपयुक्त असल्याने लहान मुलांना किमान योगा करण्यासाठी पालकांनी प्रवृत्त करावे. याबरोबरच लंगडी, लिंबूचमचा, रस्सीखेच, उठाबशा अशा कवायती संध्याकाळी घरातल्या घरात केल्याने शारीरिक हालचाली होण्यास मदत होते. मुलं पूर्णवेळ घरात असल्याने त्यांना घरातील कामं करण्याची सवयही पालकांनी लावावी. स्वत:ची खोली आवरणे, कपड्यांच्या घड्या घालणे यासह खोलीतील केर काढण्याचे उद्दिष्ट त्यांना द्यावे. घरीच आहे, हॉटेलात नेता येत नाही म्हणून जंक फूड देणं टाळणं महत्वाचं आहे. टीव्ही किंवा मोबाईलपुढं बसून हे खाद्यापदार्थ खाणं आरोग्यासाठी धोकादायक आहे.

बश्या वृत्तीमुळे वाढतंय वजन

कोविड काळात मुलांचे घराबाहेर पडणं बंद झाले आहे. शाळा आणि मैदाने बंद असल्यामुळे मुलं घरातच कोंडली गेली. शिक्षणाच्या निमित्ताने हातात आलेल्या मोबाईलने मुलांमधील बसून राहण्याची वृत्ती वाढीस लावली. ऑनलाईन क्लास झाला की हातात असलेल्या मोबाईलवर गेम्स खेळण्यापासून व्हिडीओ बघण्यात मुलं तासनतास व्यस्त आहेत. कमी वयात जाडी वाढल्यामुळे त्याचा शरिरावर विपरीत परिणाम होतो. रक्तदाब वाढणे, हृदयाशी निगडीत आजार बळावणे, मधुमेह आदी आजारांना या चिमुरड्यांना सामोरे जावं लागतं.

कोट :

लहान मुलांचे डॉक्टर काय म्हणतात

कोणत्याही कारणांनी घराबाहेर न पडणारी मुलं घरात असली की जास्त खातात. तीनवेळचे जेवण सोडून बेकरी पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे ते लठ्ठ होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी मुलांना अंगणात सायकल चालवायला द्यावी. दोरीच्या उड्याही उपयुक्त व्यायाम प्रकार आहे.

- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हाती सरसकट मोबाईल आला आहे. ऑनलाईन शिकवणी संपली तरीही मुलं मोबाईल हातातून सोडत नाहीत. मुलं शारीरिक श्रम करत नाहीत, बाहेर जाऊन खेळणं शक्य नाही, त्यामुळे लठ्ठपणा वाढतोय. घरात व्यायाम व शारीरिक खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं महत्त्वाचं आहे.

- डॉ. चित्रा दाभोलकर, बालरोगतज्ज्ञ

पालक म्हणतात

शाळेच्या क्लासमुळे मुलगी विनयाचा स्क्रिनटाईम वाढल्याचं आमच्या लक्षात आलं. कडक लॉकडाऊन असल्याने तिला कुठं बाहेर पाठवणं शक्य नव्हतं. तिच्या शारीरिक हालचाली होतील यासाठी आम्ही तिच्यासोबत खेळलो. आता तिला या खेळांची गोडी लागली.

- अमर जाधव, सदर बझार

लॉकडाऊनमुळे पूर्णवेळ घरातच थांबल्याने मुलांमध्ये आळस शिरला आहे. घरात राहून मुलांची तब्येत वाढली आहे, पण ते सुदृढ नक्कीच नाहीत. घरातल्या घरात व्यायाम करून घेणं आणि त्यांचे रूटीन सेट करणं हे पालकांपुढचे मोठे आव्हान आहे.

- अ‍ॅड. नीता फडतरे, गोडोली

Web Title: There were little children sitting in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.