..त्या डाॅक्टर करताहेत कोरोनात मोफत रुग्ण्सेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:36 AM2021-04-13T04:36:47+5:302021-04-13T04:36:47+5:30
कराड सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या धक्कादायक आहे. आरोग्य यंत्रणाही तोकडी पडत आहे. कराड ...
कराड
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या धक्कादायक आहे. आरोग्य यंत्रणाही तोकडी पडत आहे. कराड पालिकेनेही नागरी आरोग्य केंद्रे उभी केली आहेत; पण तेथे डॉक्टरांची कमतरता भासत आहे. ही गंभीर परिस्थिती ओळखून डॉ. तेजस्विनी सौरभ पाटील या विनामोबदला नागरी आरोग्य केंद्रात सेवा करीत आहेत. त्यांच्या या कर्तव्याचे कौतुक तर करायलाच हवे!
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड पालिकेने शहरात चार ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तेथे कोरोना तपासणीबरोबर लसही दिली जात आहे. अजून चार ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे; पण या सगळ्यात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणे अवघड झाले आहे. पालिका डॉक्टरांना पगार द्यायला तयार आहे, तरीदेखील डॉक्टर उपलब्ध होताना दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
या सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. तेजस्विनी पाटील यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये मी स्वतः कोणत्याही मानधनाशिवाय रुग्णसेवा करण्यासाठी तयार आहे, असे सांगितले. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून त्या पालिकेच्या आरोग्य केंद्रात आपले कर्तव्य बजावत आहेत.
डाॅ. तेजस्विनी पाटील यांचे पती सौरभ पाटील हे कराड पालिकेत लोकशाही आघाडीचे गटनेते म्हणून काम करतात. सामाजिक कार्यात ते नेहमीच आघाडीवर असतात. कोरोनाच्या काळातही गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांची धडपड असते. नगरसेवक हा खऱ्या अर्थाने लोकांचा सेवक असतो, या भावनेने ते काम करताना दिसतात.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशात पत्नीचे योगदान मोठे मानले जाते. सौरभ पाटील यांच्या कामात डॉ. तेजस्विनी यांची मदत नेहमीच होत असते; पण त्याही पुढे जाऊन या संकट काळात त्यांनी सुरू केलेली मोफत रुग्णसेवा इतरांना प्रेरणादायी नक्कीच आहे.
चौकट
स्वतःही झाल्या होत्या बाधित...
गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा डॉ. तेजस्विनी पाटील यांनी कराड येथील झोपडपट्टी भागात मोफत वैद्यकीय सेवा पुरवली होती. ही सेवा करताना त्या स्वतःही कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यावेळी घरीच राहून त्यांनी उपचार घेतले होते.
चौकट
बोध घेण्याची गरज ...
‘रुगणसेवा हीच ईश्वरसेवा’ मानली जाते. त्यामुळे आज आलेल्या या मोठ्या संकटाला परतवून लावण्यासाठी शहरातील इतर डॉक्टरांनीही आपले दवाखाने सांभाळत पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला मदत करण्याची गरज आहे. त्यांनी थोडा जरी वेळ दिला तर बऱ्याच प्रमाणात मोहीम यशस्वी व्हायला मदत होईल.
कोट
आज संकट मोठे आहे. आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. अशावेळी रुग्णांना खरी मदतीची गरज आहे. त्यासाठीच मी माझ्या परीने छोटासा प्रयत्न करीत आहे. मला माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबांकडून सामाजिक कार्याचा वारसा आहे. तो जपणे माझे कर्तव्य आहे.
डाॅ. तेजस्विनी पाटील
कराड
फोटो : कराड येथे नागरी आरोग्य केंद्रात रुग्णसेवा करताना डाॅ. तेजस्विनी पाटील.