हे वाहनचालक देतात 'आरटीओ'ला हजारो, लाखो रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:27 AM2019-12-20T00:27:38+5:302019-12-20T00:28:38+5:30
राज्यभर सध्या आर्थिक मंदिचे सावट आहे. नवीन वाहने खरेदीचे प्रमाणही अलीकडच्या काळात कमी झालं आहे. मात्र, असे असले तरी साताºयात जरा वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हौसेसाठी कोणी काय करेल, याचा नेम नाही. नवीन वाहन घेताना गाडीच्या निम्म्या किमतीएवढी रक्कम मोजून अनेकजण
दत्ता यादव।
सातारा : हौसेला मोल नसते, असं म्हटलं जातं हे खरं आहे. सध्या आर्थिक मंदीची सर्वत्र झळ बसत असतानाच सातारकरांनी मात्र गाड्यांच्या आकर्षक नंबरच्या केवळ हौसेसाठीआठ महिन्यांत २ कोटी १४ लाख रुपये मोजले आहेत. यावरूनच आर्थिक मंदीची झळ हौस करणाऱ्यांना बसतेय की नाही, हे दिसून येतेय.
राज्यभर सध्या आर्थिक मंदिचे सावट आहे. नवीन वाहने खरेदीचे प्रमाणही अलीकडच्या काळात कमी झालं आहे. मात्र, असे असले तरी साताºयात जरा वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हौसेसाठी कोणी काय करेल, याचा नेम नाही. नवीन वाहन घेताना गाडीच्या निम्म्या किमतीएवढी रक्कम मोजून अनेकजण आवडीचा आकर्षक नंबर घेत आहेत. आपल्या वाहनाला आकर्षक नंबर असावा, या पाठीमागे काहींची भावनाही असते. तर काहींची लग्नाची तारीख, बर्थडेट, शुभ नंबर, लकी नंबर समजून सातारकर गाडीचे नंबर खरेदी करत आहेत.
आपल्या आवडीचा नंबर खरेदी करताना तिप्पट फी भरून काहीजण नंबर घेत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहायला मिळत आहे. आठ महिन्यांत २ कोटी १४ लाख ४२ हजार रुपये केवळ हौसेसाठी सातारकरांनी मोजले आहेत. यावरूनच सातारकरांच्या हौसेला किती मोल आहे, हे दिसून येते.
अशा प्रकारचे आवडीचे नंबर घेताना सातारकरांकडून मागे-पुढे पाहिले जात नाही. एकाच नंबरवर जास्त लोकांनी दावा केला तर लिलाव पद्धतीने तो नंबर संबंधिताला दिला जात आहे.
जो जास्त पैसे देईल, त्याला तो आकर्षक नंबर दिला जात आहे. आर्थिक मंदीची झळ हौसेसाठी
मात्र बसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या हौसेसाठी लोक वाटेल ते करायला तयार आहेत. गाडीच्या आकर्षक नंबरवरून आपली प्रतिष्ठाही समाजात होईल, याकडेही अनेकांचा कटाक्ष असतो.
बुलेट दीड लाखाची.. नंबरसाठी ५० हजार
एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी नवीन दीड लाखाची बुलेट खरेदी केली. त्या बुलेटला आकर्षक नंबर घेताना संबंधित व्यक्तीने तब्बल ५० हजार रुपये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भरले. गाडीच्या किमतीच्या निम्मी रक्कमही अनेकजण आकर्षक नंबरसाठी देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याने घेतला मुलाच्या जन्मतारखेचा नंबर
बऱ्याच वर्षांनंतर मुलाचा घरात जन्म झाल्यानंतर एका व्यक्तीने नवीन कार खरेदी केली. मात्र, त्या कारचा नंबर मुलाचा जन्म झाल्याची तारीख असावी, असा त्याचा आग्रह होता. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आल्यानंतर त्याने एक लाख रुपये भरून आपल्याला हवा असलेला नंबर घेतला. या पाठीमागे लोकांची भावनिकता दिसून येते.
शासकीय गाड्यांनाही मोजावे लागतायत पैसे
शासकीय गाड्यांचे आकर्षक नंबर पूर्वी मोफत मिळत होते. १००, ९९९९ हे आकर्षक नंबर पूर्वी फार प्रसिद्ध होते. मात्र, आता शासकीय गाड्यांनाही सरसकट सर्वांनाच आकर्षक नंबरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. हा नियम १५ मे २०१३ पासून सुरू झाला आहे.
गाड्यांचे आकर्षक नंबर घेण्यासाठी सातारकरांमधून चांगला प्रतिसाद आहे. आठ महिन्यांत मिळालेला महसूल चांगला आहे. परंतु अजून साडेतीन महिने बाकी आहेत. नक्कीच तीन कोटींपर्यंत हा आकडा जाईल.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा
मंदीतही
चांदी...