Satara: अंगावर रेनकोट, चेहऱ्याला मुखपट्टी; वाईत पिस्तुलाचा धाक दाखवून चाळीस लाखांचे सोने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:33 PM2024-07-30T16:33:22+5:302024-07-30T16:42:50+5:30
कारागिरांना दुकानात कोंडून ठेवले.
वाई : सोन्याचे दागिने बनविणाऱ्या दोन बंगाली कारागिरांना कोयता आणि पिस्तुलाचा धाक दाखवून चाळीस लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. रविवारी रात्री वाई येथे ही घटना घडली. याबाबत वाई पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई येथील सोने-चांदी बाजारपेठेतील लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये सोन्याचे दागिने बनविणाऱ्या संजय जयंता मयंती आणि मृत्युंजय जयंता मयंती या दोन बंगाली कारागीर भावांची दुकाने आहेत. या ठिकाणी दररोज ते सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करत असतात. रविवारी रात्री बाजारपेठ बंद झाल्याचा गैरफायदा घेऊन पावसाळी कपडे व चेहऱ्याला मुखपट्टी लावलेल्या दोन अज्ञात युवकांनी सुरुवातीला संजय जयंता मयंती याच्या दुकानात प्रवेश केला. शटर अर्ध्यावर घेऊन कोयत्याचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवून एका कामगाराला कोयत्याने किरकोळ मारहाण केली.
दुकानात कामासाठी असलेले ३७८ ग्रॅम वजनाचे २५ लाख ९५ हजार ६०० रुपयांचे सोने ताब्यात घेतले. संजय मयंती याला व त्याच्या कारागिरांना दुकानात कोंडून ठेवले. यानंतर लगतच असलेल्या त्याचा भाऊ मृत्युंजय जयंती याच्या दुकानात प्रवेश करून कोयता पिस्तुलाचा धाक दाखवून २०० ग्रॅम वजनाचे १३ लाख ७५ हजार किमतीचे सोने घेऊन पलायन केले.
विष्णू मंदिर चौकात उभ्या केलेल्या दुचाकीवरून ते निघून गेले. या प्रकरणात कारागीर आणि व्यापारी यांचे मिळून ३९ लाख ६९ हजार रुपयांचे सोने लुटून नेल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात संजय मयंती यांनी दाखल केला आहे.
याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पोलिस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, अमोल गवळी, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ दाखल झाले. रात्रीपासून कसून तपास सुरू आहे. घटनास्थळी लवकरच आम्ही संशयितांना ताब्यात घेऊ, असे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर विभाग सुनील फुलारी यांनी वाईला भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे करत आहेत.
ग्रामसुरक्षा यंत्रणेवरूनही दिले संदेश
वाई बाजारपेठेत चोरी झाल्यानंतर लगेचच रात्री साडेदहा वाजता ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून सर्वांना संदेश देण्यात आला. चोरट्यांचे वर्णन करून संबंधित चोरटे कोठे दिसल्यास जवळच्या पोलिस स्थानकात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अजूनही चोरटे हाताला लागलेले नाहीत.