‘कमवा व शिका’च्या मुलांनाच त्यांनी मानली आपली भावंडं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:03 PM2018-08-26T23:03:26+5:302018-08-26T23:03:30+5:30
भोलेनाथ केवटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना देशमुख कुटुंबीय राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करीत आहे. गेल्या ३४ वर्षांपासून या कुटुंबाने विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध जपले आहेत.
साताºयातील अरविंद देशमुख हे अनाथ. लहानपणीच त्यांच्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं. ते एकटेच असल्याने त्यांना आई-वडिलांची तसेच बहिणीची उणीव भासत होती. त्यांचं सर्व शिक्षण हे वसतिगृहातच झाले. १९७७ मध्ये कमवा व शिका योजेनतून त्यांनी शिक्षण घेतलं, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी महाविद्यालयाच्या शेतात तसेच इतर विभागांत काम करून शिक्षण घेत असतात. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या सुख-दु:खाची त्यांना जाणीव होती. यातूनच अरविंद देशमुख यांनी पत्नी अरुणा यांच्यापुढे कमवा व शिका योजनेच्या मुलांना राखी बांधण्याची कल्पना सुचविली आणि दोघांनीही १९८५ पासून हा उपक्रम सुरू केला.
या योजनेतील मुलं गरीब आहेत. कामामुळे आणि शिक्षणामुळे या मुलांना त्यांच्या स्वत:च्या घरी रक्षाबंधनासाठी जाता येत नाही. त्यात काही मुलांचे गावही खूप लांब आहेत. त्यामुळे या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतून देशमुख कुटुंबीय दरवर्षी या मुलांना न चुकता राख्या बांधतात व त्यांना बहिणीची उणीव कधीच भासू देत नाहीत. देशमुख कुटुंबीयांचा हा उपक्रम गेल्या ३४ वर्षांपासून अविरत सुरू आहे. या सोहळ्यात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, प्रा. रामराजे माने-देशमुख, प्रा. राहुल व्हराडे यांच्यासह विद्यार्थीही सहभागी झाले होते.
शस्त्रक्रिया असतानाही घेतला कार्यक्रम..
दोन वर्षांपूर्वी रक्षाबंधनादिवशीच देशमुख यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या पत्नीला वसतिगृहातील मुलांना राख्या बांधण्यासाठी पाठविले होते. मुलांविषयी असणारे त्यांचे हे प्रेम त्यावेळीही प्रकर्षानं जाणवलं.
पूर्ण कुटुंबाचा सहभाग
या उपक्रमात अरविंद देशमुख यांच्या पत्नीबरोबर त्यांच्या अमृता व अनुजा या दोन मुली, सून अंजली तसेच मुलगा अमरदीप यांचादेखील सहभाग असतो. हे कुटुंब मुलांसाठी अल्पोपहारसुद्धा देतात.
मी स्वत: कमवा व शिका योजनेचा विद्यार्थी असल्याने मला या मुलांबद्दल विशेष प्रेम आहे. बॅरिस्टर पी. जी. पाटील यांच्या पे्ररणेतून मी व माझ्या पत्नीने या मुलांना राखी बाधंण्याचे ठरविले. मुलांच्या मनगटावर राखी बांधताना त्यांच्या चेहºयावरील आनंद पाहून मला मनोमन समाधान वाटतं.
- अरविंद देशमुख, निवृत्त अधीक्षक