..त्यांनी दगडं मारली तरी नवल वाटून घेऊ नये

By admin | Published: December 25, 2016 11:37 PM2016-12-25T23:37:56+5:302016-12-25T23:37:56+5:30

उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर घणाघात : निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला

They should not be surprised if they have stoned a stone | ..त्यांनी दगडं मारली तरी नवल वाटून घेऊ नये

..त्यांनी दगडं मारली तरी नवल वाटून घेऊ नये

Next

सातारा : ‘तुम्ही महाराज म्हणवून घेत आहात तर शिवस्मारक भूमिपूजनाला विशेष उपस्थिती म्हणून आमच्यासारखे शासनाचे विशेष आमंत्रण तुम्हाला का नव्हते? आम्ही महाराज आहोत म्हणून शिवेंद्रसिंहराजे स्वत:ला महाराज म्हणवून घेत असतील तर तो त्यांचा वेडगळपणा आहे. उगाचच नाक कापलं तरी भोके आहेत, अशा स्वार्थी विचाराचे हे शिवेंद्रबाबा, निव्वळ भोंदूबाबा आणि भोंदूमहाराज बनून आमच्याशी स्पर्धा करायला जात आहेत. स्पर्धा बरोबरीच्या व्यक्तींशी होते हे सुद्धा ज्यांना कळत नाही. त्यांनी उद्या रस्त्यावर दगडं मारायला सुरुवात केली तर जनतेने नवल वाटून घेऊ नये, परिणाम झाला आहे असं समजून सोडून द्यावे,’ असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उदयनराजे यांनी म्हटले आहे की, ‘राजकारणात चढ उतार नेहमीच असतात, असे आम्ही वारंवार सांगत असतो. त्यामुळे उगाच तुमचे ३७ आणि आमचे २ होते त्यानंतर
आमचे १९ व तुमचे १८ कसे झाले? असल्या वायफळ अन्वयार्थांना काहीच महत्त्व नाही. नगरपरिषदेमधील तुमची सत्ता क्लोज झाल्याने, तुम्ही आकड्यांंचा खेळ ओपन केला आहे. इतकाच त्याचा अर्थ आहे. तसेच ४०-० च्या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा भोंदूबाबाने केली
आहे. नगराध्यक्षपदासह बहुमत
तेही निर्विवाद मिळाले, त्यातच ४०-० झाल्यासारखेच आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ४०-० चे
उद्गार आम्ही काढले आहेत. राजकारणात आणि युद्धात सगळे क्षम्य असते.
समाजसेवक आहात तर काय कामे केली ते सांगा अशी निरर्थक व वायफळ बडबड ते करत आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला दारुण व मानहानीकारक पराभव सहन न झाल्यानेच, असे होत असावे. खरेतर पराभवाचे आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे.
आम्हास काय विकासकामे केली, अशी विचारणा करण्यापूर्वी तुमच्या आणि तुमच्या पिताश्रींनी सलग ३९ वर्षांत काय काम केले ते अगोदर सांगा किंंवा आम्ही नुकताच जसा
सवाल जबाबाचा कार्यक्रम आयोजित केला होता, तसा तुम्ही जाहीर कार्यक्रम आयोजित करावा मग तुमची
काय पात्रता आहे ते दिसून येईल. आमच्या कार्यक्रमाच्या वेळी तुम्हालाही या म्हणून आवाहन केले होते. तुम्ही मात्र नेहमीप्रमाणे पळपुटेपणा दाखवलात.
आम्ही काय किंवा कुणीही दुसऱ्याला एक-दोनदा फसवू शकू मात्र, स्वत:च्या मनाला कधीच फसवू शकणार नाही. त्यामुळे योग्य वेळ आली की, आम्ही काय काम करत होतो, हवा पालटायला जात होतो का संसदेत होतो, का कुणाची हवा काढून घेत होतो, हे लवकरच तुम्हाला समजेल. आता समजण्याइतकी तुमची क्षमता आणि मानसिकताही राहिलेली नाही.
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सहकारातील भ्रष्टाचाऱ्यांच्याबाबत चर्चा झाली आहे. प्रकरणे दिल्लीत आणा,
धसास लावतो, असे देखील त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी तुम्ही माशांसाठी जाळे टाकलेत; पण मगरी काठावर बसल्याने मगरी सापडत नाहीत. उगाच गरीब, शेतकरी
आणि सामान्यांचे हाल होत आहेत, असेही त्यांना आम्ही सांगितले. मोदीजींनी त्यांच्या भाषणात देखील बेईमानांची बरबादी होईल, असे वक्तव्य केले आहे, तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या बेईमानाच्या जंत्र्याच आमच्याकडे आहेत, आता जनतेने सुद्धा बेईमानांची पुराव्यासह यादी आमच्याकडे द्यावी. या चांगल्या कार्याला साताऱ्यातून सर्वप्रथम सुरुवात व्हावी.
चांगल्या कार्याची सुरुवात सातारा जिल्ह्यातूनच होण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. तुमची आता पुरती कोंडी झाल्याने विनाशकाले विपरीत बुद्धी तुम्हाला सुचत आहे, ‘यह तो सिर्फ ट्रेलर है, पुरी पिक्चर अभी बाकी है,’ असेही शेवटी उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
लाळघोटेपणा आम्हाला जमणार नाही
‘पत्रिकेत आमच्या नावाचा उल्लेख असलाच पाहिजे, असा हट्टाहास कधीच नसतो तसेच आम्हाला महाराज म्हणावे, असेही आम्ही कोणाला सांगत नाही. तथापि, पक्षाच्या बऱ्याच बॅनर आणि पत्रकावरून आमचे छायाचित्र वगळण्यात येत असे, तीच परिस्थिती शासकीय कार्यक्रमाच्या बाबतीतही होत असे, असा उपमर्द आम्ही सहन करणारे नाही, म्हणूनच राजशिष्टाचाराप्रमाणे आमचे नाव असावे, असे म्हणणे म्हणजे स्वाभिमानी बाणा आहे. तुमचे नाव कुठे असले काय आणि नसले तरी तुमच्यासारखा लाळघोटेपणा आम्हाला कधीच जमणार नाही,’ असेही उदयनराजे म्हणाले.
सहकाराच्या नावाखाली संस्था बुडविल्या
राजमाता सुमित्राराजे यांचे कर्तृत्व आम्हालाही मान्य आहे. त्यांचा दाखला देत आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुमचे पिताश्री दिवंगत अभयसिंहराजे आणि तुम्ही सहकाराच्या नावाखाली अजिंक्यतारा बँक, अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्य दूध संघ, अजिंक्यतारा वाहतूक संघटना, अजिंक्य बझार अशा अनेक सहकारी संस्थांचा स्वत:साठी वापर करून झाल्यावर या सर्व संस्था शेवटी तुम्ही बुडविल्या. सूतगिरणीची तीच अवस्था होती. आता टेलरिंग फर्मचा टेकू घेतला आहे म्हणे, परंतु तोपर्यंत तुमच्याकडून संबंधित सभासदांच्या सदऱ्याची सुतं उचकटून झाली आहेत. त्यावेळी राजमाता सुमित्राराजेंची शिकवण विसरलात का? तुमच्या सहकार्याने अपराधांच्या अपराधांची मालिका सुरू करून विक्रम करणाऱ्यांंनी निरपराध शेतकऱ्यांना खूप त्रास दिला त्यावेळी तुमची नीतीमत्ता कुठे गेली होती, याची उत्तरे तुम्ही द्यायलाच पाहिजेत.
जुन्या नोटांबाबत तुम्ही काय प्रयत्न केले; आमचा मोर्चा नौटंकी वाटणे स्वाभाविक
‘नोटाबंदीमुळे पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने, शेतकरी कष्टकरी आदींचे होणारे हाल शासनाचे निदर्शनास आणण्यासाठी आम्ही मोर्चाचे नियोजन सुरुवातीस दि. १४ रोजी केले होते. त्याच दिवशी नागपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन होते. या मोर्चास सातारा जिल्ह्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने जाणार असल्याने, आम्ही आमचा मोर्चा दि. १७ तारखेपर्यंत पुढे ढकलला. दरम्यान, जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याचा धोरणात्मक निर्णय आरबीआय व सरकारने घेतला, तसेच नवीन चलनही बँकांना पुरवण्याचे नव्याने आदेश निघाले. मोर्चाचा मुख्य हेतू साध्य झाल्याने, मोर्चा काढून जनजीवन अजून विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही मोर्चा स्थगित केला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्यांनी जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी काय प्रयत्न केले हे कधीच सांगितले नाही. नोटाबंदीबाबत बोललो तर आपण भ्रष्ट ठरू म्हणून तुम्ही मुग गिळून बसलात. आमचा मोर्चा म्हणजे तुम्हाला नौटंकी वाटणे स्वाभाविक आहे. त्यात तुमचा म्हणजेच शिवेंद्रबाबा ऊर्फ भोंदूबाबा ऊर्फ भोंदू महाराज यांचा दोष नाही,’ असा उपरोधक टोला देखील उदयनराजे भोसले यांनी लगावला.

Web Title: They should not be surprised if they have stoned a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.