चोर शिरजोर; तरीही ‘खाकी’लाच पडला घोर!
By admin | Published: December 29, 2016 12:21 AM2016-12-29T00:21:52+5:302016-12-29T00:21:52+5:30
कऱ्हाड अस्वस्थ : पोलिसांनाच बेड्या; मारामारीच्या घटनांत वाढ
संजय पाटील ल्ल कऱ्हाड
सरते वर्ष कऱ्हाडच्या पोलिसांना तसेच शहरवासीयांनाही अस्वस्थ करणारे ठरले. वर्षाच्या मध्यंतरात संशयिताच्या खूनप्रकरणी पोलिसांवरच गुन्हा दाखल झाला. संबंधित पोलिस निलंबित झाले. तसेच नुकतीच त्यांना अटकही झाली. दरम्यानच्या कालावधीत शहरामध्ये खून, मारामारी, चोरीसारख्या अन्य गंभीर घटना घडल्या. त्यामुळे शहरातील वातावरणही अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले.
कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी विकास धस यांची नेमणूक झाल्यानंतर शहरातील कायदा, सुव्यवस्था आणखी बळकट होण्याची अपेक्षा होती. मात्र, अशातच संशयित रावसाहेब जाधवचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. त्यामुळे जून महिना पोलिस दलात खळबळ माजविणारा ठरला. संशयिताच्या मृत्यूनंतर शहरातील वातावरण चिघळले. जमावाने मोर्चा काढला. अखेर निरीक्षक धस यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना घडून गेल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा पोलिसांवर विनाकारण मारहाणीचा आरोप झाला. स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील एका युवकाला शस्त्र बाळगल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेऊन कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आरोप संबंधित युवक व त्याच्या नातेवाइकांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकरणात तक्रार झाली. मात्र, पुढे वातावरण निवळले.
दरम्यानच्या कालावधीत शहरामध्ये चोरी व मारामारीच्या घटना घडल्या. चोरट्यांनी बंद फ्लॅटला लक्ष केले. लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला. धूमस्टाईल चोरट्यांनी बँकेची अठरा लाखांची रोकड लंपास केली. तसेच ट्रॅव्हल्समधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिनेही चोरीस गेले. अनेक दुचाकींवर चोरट्यांनी डल्ला मारला.
या घटना होत असतानाच मारामारीच्या गंभीर स्वरूपाच्या घटनाही घडल्या. शहरातील एका मोबाईल शॉपीत काही युवकांनी तोडफोड केली. ही तोडफोड तत्कालिक कारणावरून झाल्याचे समोर येत असले तरी शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता त्या घटनेने समोर आली. शहरात खुनाच्या वर्षभरात चार घटना घडल्या.
पोलिसांचा गौरवही
दत्त चौकातील पाटील हेरीटेज इमारतीत चोरीची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी धोका पत्करून संबंधित चोरट्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी चोरट्यांनी हल्ला केल्याने दोन पोलिस कर्मचारीही गंभीर जखमी झाले होते. शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या या कामगिरीचा त्यावेळी पोलिस दलासह शहरवासीयांनीही गौरव केला.