Satara: लक्ष्मीपूजनासाठी घरी आणलेले ११० तोळ्यांचे दागिने चोरीस, दीड लाखाची रोकडही लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:02 PM2024-11-05T16:02:06+5:302024-11-05T16:02:28+5:30
कऱ्हाड : लक्ष्मीपूजनासाठी घरात आणलेले ११० तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ओगलेवाडी, ता.कऱ्हाड ...
कऱ्हाड : लक्ष्मीपूजनासाठी घरात आणलेले ११० तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ओगलेवाडी, ता.कऱ्हाड येथील उद्योजकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी केलेली ही सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी-करवडी फाटा येथील खरेदी-विक्री संघाच्या पाठीमागे ओढ्यालगत उद्योजक दिवंगत वसंत खाडे यांचा ‘साई व्हिला’ बंगला आहे. याच ठिकाणी त्यांचे वर्कशॉप व गारमेंट आहे. वसंत खाडे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले असून, त्यांची पत्नी, मुलगा प्रतीक व सून असे ‘साई व्हिला’ बंगल्यात वास्तव्यास आहेत. दिवाळीचा सण असल्याने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान वर्कशॉप व गारमेंटमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. केवळ रात्र व दिवसपाळीसाठी तीन सुरक्षारक्षक शिफ्टनुसार कामावर हजर होते.
२ नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रतीक व त्यांच्या पत्नी दोघे जण सांगली येथे पत्नीच्या माहेरी गेले, तर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची आई हजारमाची येथील त्यांच्या माहेरी गेल्या. जाताना त्यांनी बंगल्याला कुलूप लाऊन घराची चावी घरकामासाठी येणाऱ्या व त्यांच्याच बंगल्यासमोरील जुन्या घरात वास्तव्यास असलेल्या महिलेकडे दिली.
दरम्यान, सोमवारी सकाळी सुरक्षारक्षक बंगल्याच्या परिसरातील लाइट बंद करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना वरच्या मजल्यावरील दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर खाडे कुटुंबीय घरी आले. त्यावेळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच, उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरविली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले.
समोर सुरक्षारक्षक; चोरटे पाठीमागून घुसले
बंगल्याच्या समोर असलेल्या केबिनमध्ये रात्रपाळीचा सुरक्षारक्षक हजर होता, तर चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या खिडकी व बाल्कनीच्या रेलींगला दोऱ्या बांधून बंगल्यात प्रवेश केल्याचे पोलिसांच्या पाहणीतून समोर आले आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
बंगला, वर्कशॉप व गारमेंट एकाच ठिकाणी असल्याने बंगल्याच्या संपूर्ण आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चोरी करण्यासाठी आलेले दोन इसमही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम घरात घुसल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे.