कोरोनामुळे चोरटेही घरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:24+5:302021-04-30T04:48:24+5:30
सातारा: जिल्ह्यात गत दीड वर्षांपासून कोरोनाने तळ ठोकला आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारांनाही कोरोनाने घरात बसवले. त्यामुळे गत दोन वर्षाच्या ...
सातारा: जिल्ह्यात गत दीड वर्षांपासून कोरोनाने तळ ठोकला आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारांनाही कोरोनाने घरात बसवले. त्यामुळे गत दोन वर्षाच्या तुलनेत एका वर्षांमध्ये अत्यंत कमी घरफोडी, चोऱ्या, मारामारी झाल्या. यामुळे साहजिकच पोलिसांवरील ताणही कमी झाला.
जिल्ह्यामध्ये गत दोन वर्षांपूर्वी रोज घरफोड्या, चोरी, मारामाऱ्या होत होत्या तसेच अधूनमधून जबरी चोरी खून पडत होते. त्यामुळे पोलिसांनाही रोजचे काम वाढले होते, अशी एकंदरीत परिस्थिती असताना कोरोनाने अचानक सर्वच परिस्थिती बदलून गेली. गुन्हेगारांच्या मागे धावणाऱ्या पोलिसांना आता रुग्णांच्या मागे धावे धावावे लागत आहे. कोणी बाधित आढळून आला तर पोलिसांना त्याचे निकटवर्तीय शोधावे लागत होते. मात्र आता हे काम पोलिसांकडे सोपवण्यात आले नसून पोलिसांना केवळ वाहतूक नियमन आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागत आहे.
गतवर्षी चार महिने कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे चोरटे घरात राहिले तर आता दुसऱ्यांदाही लॉकडाऊन सुरू झाल्याने चोरट्यांना बाहेर पडण्यास जमेना. त्यामुळे साहजिकच घरफोड्याही कमी आल्या. त्यामुळे पोलिसांनाही यानिमित्ताने का होईना दिलासा मिळाला.
गतवर्षी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा पहिल्यासारख्या मारामाऱ्या, घरफोडी, चोरी अशा घटना वाढू लागल्या. त्यामुळे पुन्हा पोलिसांची डोकेदुखी वाढली. एकीकडे कोरोनाची परिस्थिती हाताळत असताना दुसरीकडे या गुन्ह्याचाही पोलिसांना तपास करावा लागत होता. मात्र पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे चोरटे घरात बसले आहेत. त्यामुळे घरफोडी आता कुठेच होत नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्यात दिवसात एकाही ठिकाणी घरफोडी झाल्याची नोंद होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकट : अत्याचार वाढले
जिल्ह्यात सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी अत्याचार आणि छेडछाडीच्या घटना काही थांबल्या नाहीत. उलट वाढलेल्या दिसून आल्या. गतवर्षी जिल्ह्यात ४२ अत्याचार व छेडछाडीचे गुन्हे नोंद आहेत. तर यावर्षी २९ नोंद आहेत. मध्यंतरी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अशा प्रकारच्या घटना वेगाने वाढल्या. तसेच मुलींच्या छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत. अजूनही अधूनमधून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
चौकट: खुनाच्याही घटना वाढल्या
जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर झपाट्याने गुन्हेगारी उफाळून आली. किरकोळातल्या किरकोळ कारणावरून एकमेकांचे खून पडू लागले. जिल्ह्यात वर्षभरात ८ जणांचे खून झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी हाच आकडा २३ वर होता. चार महिन्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे बरेच गुन्हे आटोक्यात आले होते.
चौकट: चोरीच्या घटना
२०१९ मध्ये झालेल्या चोरीच्या घटना १२६
२०२० मध्ये झालेल्या चोरीच्या घटना ८१
२०२१ मध्ये झालेल्या चोरीच्या घटना ५३