चोरटे पसार; पण औषधे सापडली!
By Admin | Published: March 9, 2015 09:38 PM2015-03-09T21:38:47+5:302015-03-09T23:47:53+5:30
‘लोकमत’मुळे प्रकार उघड : शामगाव घाटात आढळला बेवारस साठा, दीड महिन्यापूर्वी झाली होती चोरी--आॅन दि स्पॉट रिपोर्ट
बाळकृष्ण शिंदे - शामगाव -येथील घाटात सोमवारी सकाळी अडीच लाख रुपये किमतीच्या औषधांचा साठा बेवारस स्थितीत आढळून आला. घाटाच्या खोल दरीत विखुरलेल्या या औषधांसोबत एक पावतीही होती. या पावतीमुळेच संबंधित औषधांच्या एजन्सीचा पत्ता लागला आणि बेवारस स्थितीत पडलेली ती औषधे चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा केल्यानंतर औषधे ताब्यात घेण्यात आली. शामगाव घाटात अनेकवेळा कचरा ओतला जातो; पण सोमवारी चक्क औषधांच्या बाटल्या आणि गोळ्यांच्या बॉक्सचा खच पडल्याचे घाटात दिसून आले. सोमवारी सकाळी ही बाब ‘लोकमत’च्या निदर्शनास आली. घटनास्थळी पोहोचलेल्या ‘लोकमत टीम’ने या बेवारस स्थितीत पडलेल्या औषधांची पाहणी केली. इतरत्र विखुरलेल्या साहित्यामध्ये इन्सुलिन, इंजेक्शनच्या सूया, गोळ्यांचे बॉक्स आढळून आले. त्याचबरोबर ‘साखरे एजन्सीज, सातारा’ या फर्मची पावतीही त्याठिकाणी आढळून आली. पावतीवर औषधांचे विवरणही होते. त्यामुळे या बेवारस औषधांचा पाठपुरावा करण्याच्या हेतूने ‘लोकमत टीम’ने पावतीवरील दुकानच्या नावावरून संपर्क साधला असता संबंधित क्रमांक विकास साखरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या एजन्सीच्या नावे असलेली औषधे शामगाव घाटात बेवारस स्थितीत पडली असल्याचे साखरे यांना त्यावेळी सांगण्यात आले. ही माहिती मिळाल्यानंतर साखरे यांनी संबंधित औषधे २४ जानेवारी रोजी रात्री चोरीस गेली होती, असे सांगितले. त्याबाबत त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्यावेळी तक्रारही दिली होती.
चोरीस गेलेली औषधे शामगाव घाटात बेवारस पडल्याची माहिती ‘लोकमत’कडून मिळाल्यानंतर विकास साखरे यांनी त्वरित साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती दिली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने शामगाव घाटात दाखल झाले. त्यांच्यासोबत विकास साखरेही त्याठिकाणी आले. औषधांच्या साठ्याचा पंचनामा केला.
गाडी जागेवर; औषधे गायब
साताऱ्यातील विकास साखरे यांच्या एजन्सीकडे २४ जानेवारी रोजी संबंधित औषधे आली होती. कंपनीकडून औषध घेऊन आलेली मालवाहतूक रिक्षा दि. २४ रोजी रात्री साखरे यांच्या घरासमोर उभी करण्यात आली होती. त्यावेळी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रिक्षाच्या हौद्याचे कुलूप तोडून आतील सर्व औषधे काढून दुसऱ्या वाहनात भरली व तेथून पोबारा केला होता. दुसऱ्या दिवशी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर साखरे यांनी पोलिसांत धाव घेऊन याबाबतची तक्रार दाखल केली होती.
चोरी ‘सीसीटीव्ही’त कैद
साताऱ्यात साखरे यांच्या गोदामबाहेरून झालेला औषध चोरीचा हा प्रकार ‘सीसीटीव्ही’त कैद झाला आहे. नजीकच्या एका दुकानाच्या ‘सीसीटीव्ही’ने चोरट्यांना टिपले असून, त्यांनी ट्रकच्या केबीनमध्ये भरून ही औषधे लंपास केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
औषधे सापडली; धोका टळला
ज्याठिकाणी ही औषधे टाकण्यात आली होती त्याठिकाणी नेहमी परिसरातील शेतकरी जनावरे चरावयास सोडतात. संबंधित औषधे जर जनावरांच्या खाण्यात आली असती तर त्यांचा जीवही गेला असता. वेळीच हा सर्व प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
चोरीला गेलेल्या औषधांचा आम्ही गेले दीड महिने शोध घेत होतो; पण ‘लोकमत’मुळे आमची औषधे शामगाव घाटात बेवारस पडलेले आम्हाला समजले. ‘लोकमत टीम’च्या सहकार्यामुळेच मला माझी चोरीस गेलेली औषधे परत मिळण्यास मदत झाली आहे.
- विकास साखरे, सातारा
औषधे बेवारस का टाकली?
विक्रीच्या उद्देशाने चोरट्यांनी ती औषधे चोरली असावीत, असा कयास आहे. त्यांनी औषधे विकण्याचा प्रयत्नही केला असावा; पण त्याची विक्री न झाल्यामुळे अखेर त्यांनी ती टाकून दिली असावीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच चोरट्यांना चोरी करताना संबंधित रिक्षात औषधे आहेत, हे माहीत नसावे. चोरी करून निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी बॉक्स उघडले असावेत, व औषधे निदर्शनास आल्याने त्यांनी ती टाकून दिली असावीत, अशी शक्यताही नाकारता येत नाही.