चोरट्यांनी सोनं चोरलं.. लेकरांनी मन जिंकलं..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:52 PM2019-04-03T22:52:20+5:302019-04-03T22:52:25+5:30
सातारा : उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत शिरकाव करून चोरट्यांनी अक्षरश: धुुमाकूळ घातला. एकीकडे हे चोरटे लोकांचे लक्ष नसताना सोनं ...
सातारा : उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत शिरकाव करून चोरट्यांनी अक्षरश: धुुमाकूळ घातला. एकीकडे हे चोरटे लोकांचे लक्ष नसताना सोनं चोरत होते, तर दुसरीकडे कष्ट करणारी चिमुरडी कार्यकर्त्यांची मनं चोरत होती.
साताऱ्यात मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीत चोरट्यांनी सुमारे ३३ तोळे सोने चोरलं. चोरट्यांचा हा प्रकार गुपचूप सुरू असतानाच पोवई नाक्यावर कार्यकर्त्यांच्या पायात पडलेल्या बाटल्या उचलण्याचं काम अवघ्या आठ ते बारा वर्षांची मुले करत होती. रॅलीत पाणी पिऊन झाले की या बाटल्या रस्त्यावर टाकण्यात आल्या. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच तीन मुलं याठिकाणी आली. हातात मोठं प्लास्टिकचं पोतं घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या पायातील रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलल्या. परस्परांना खुणवून त्यांनी आपापलं कार्यक्षेत्रही निश्चित केलं होतं.
राजवाडा, सिटी पोस्ट आणि पोवईनाका येथे आपल्या आईसह ही तीन मुलं फिरत होती. रॅली नाक्यावर पोहोचल्याचा अंदाज घेऊन एकेक मूल पोवई नाक्यावर पोहोचले.
याविषयी ‘लोकमत’शी बोलताना त्यांच्यातील सुदेश म्हणाला, ‘उन्हाळ्याच्या दिवसात पाणी वाटतात, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही पाच पोती घेऊन घरातून बाहेर पडलो; पण बाटल्या जास्त मिळाल्या. म्हणून ठेकेदाराकडे तीन पोती रिकामी करून पुन्हा नाक्यावर आलो. ठेकेदार बाटल्या न मोजता एका पोत्याचा हिशोब लावणार. गेल्या तीन तासांत आम्ही ९ पोती भरून रिकाम्या बाटल्या गोळा केल्यात. त्यातून हजार-बाराशे रुपये सहज मिळतील.’ शाळेत जातो का? या प्रश्नावर चटकन उत्तर आलं, ‘आज सकाळीच पेपर होता. परीक्षा दिली, आहार खाल्ला अन् कामाला आलो. एकट्या आईला हे गोळा करणं अवघड झालं असतं ना?’
गर्दीतील अनेकांनी आपल्या पायाजवळील रिकाम्या बाटल्या त्यांच्या पोत्यात टाकून त्यांनाही या कामात मदत केली.
मिरजेच्या कार्यकर्त्याची सतर्कता
या रॅलीत सांगली-मिरज या भागातूनही कार्यकर्ते जमा झाले होते. मिरज येथे सोने-चांदीचे व्यापारी असलेले विक्रम देसाई यांच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्नही शेटे चौक परिसरात झाला; पण गळ्यामागे कोणाचातरी हात आल्याने ते सतर्क झाले. त्यांनी गळ्यातील चेनला हात लावेपर्यंत चेन पेंडंटसह हातात आली. पण गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातील काही रक्कम मात्र चोरट्यांनी पळविली.
एक पोतं बाटल्या अन् दीडशेची जुळणी
रॅलीच्या ठिकाणी सुमारे दहा हजार बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यातील अनेकांनी पाणी पिऊन बाटली तिथेच टाकली. या बाटल्या पोत्यात भरून भंगार व्यावसायिक यांच्याकडे विक्रीसाठी नेल्या जातात. एका पोत्याला साधारण दीडशे रुपयांचा भाव मिळण्याचा अंदाज आहे. रणरणत्या उन्हात चार तास काम केल्यानंतर या चारजणांना दीड हजार रुपये मिळतील, अशी खात्री त्यांना होती.