सातारा: पाटण तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ, बंद घरे फोडून मारला दागिन्यांवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 06:32 PM2022-08-04T18:32:39+5:302022-08-04T18:35:02+5:30
या घटनेने संपूर्ण चाफळसह पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हणमंत यादव
चाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. विभागातील जाळगेवाडी खालची वरची, गमेवाडी, माथणेवाडी व माजगांव गावातील एकुण १५ बंद घरे फोडून १४.५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना काल, बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने संपूर्ण चाफळसह पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाळगेवाडी येथील महादेव भिकू चव्हाण यांचे खालची जाळगेवाडी येथे घर आहे. बुधवारी रात्री ते पाहुण्यांकडे गेले होते. सकाळी परत घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलुप तोडल्याचे दिसले. तर, घरातील सात तोळे सोने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान गावातील १५ बंद घरे फोडून चोरट्यांनी एकुण सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे १४.५ ताळे सोने लंपास केल्याची नोंद चाफळ पोलिसांत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सिध्दनाथ शेडगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.